

बदलापूर: ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारे बदलापूर येथील बारवी धरण झपाट्याने आटत असून धरणातील पाणीसाठा धोकादायक पातळीवर पोहोचला आहे. सध्या धरणात केवळ 33 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिल्याने ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, बदलापूर, अंबरनाथ आणि उल्हासनगर परिसरावर पाणीटंचाईचे गंभीर संकट ओढावण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
उन्हाचा वाढता तडाखा, वाढती लोकसंख्या आणि पाण्याचा वाढलेला वापर यामुळे बारवी धरणातील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस धरणातील पाणीपातळी घसरत असली तरी यंदा परिस्थिती अधिक चिंताजनक असल्याचे जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
बारवी धरणाची एकूण साठवण क्षमता सुमारे 340.48 दशलक्ष घनमीटर (एमसीएम) इतकी आहे. मात्र सध्या धरणात अवघे सुमारे 112 एमसीएम पाणी शिल्लक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. बारवी धरण हे ठाणे जिल्ह्यातील प्रमुख जलस्रोत मानले जाते.
या धरणातून ठाणे जिल्ह्यातील अनेक शहरांना दररोज लाखो लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र सध्या उपलब्ध पाणीसाठा पाहता आगामी काही आठवडे काटकसरीने पाणी वापरण्याची वेळ येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने प्रशासनाने नागरिकांना पाणी बचतीचे आवाहन केले आहे. अनावश्यक पाणी वापर टाळणे, वाहन धुणे, पाईपने पाणी मारणे, गळती तातडीने दुरुस्त करणे आणि पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.
विहिरी, बोअरवेलची पातळीही घटू लागली
याशिवाय पावसाळा लांबल्यास किंवा समाधानकारक पाऊस न झाल्यास काही भागांत टप्प्याटप्प्याने पाणी कपात लागू करण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामीण भागात तर विहिरी आणि बोअरवेलची पातळीही घटू लागल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.
अनेक ठिकाणी टँकरच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, हवामान खात्याने मान्सून लवकर दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केला असला तरी तोपर्यंत उपलब्ध पाणीसाठा पुरविण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.