बेळगाव : महापालिकेत कर्नाटकच्या समर्थनार्थ ठराव करण्यात यावा, यासाठी कन्नड संघटनांनी आणि मराठीविरोधी ठराव करण्यात येऊ नये, यासाठी मराठी जनतेकडून आमदार राजू सेट यांच्यावर दबाव टाकण्यात येत आहे. त्यामुळे, आमदार सेट यातून कसा मार्ग काढतात, महापालिकेच्या सभेत काय होणार, याकडे लोकांचे लक्ष लागून राहिले आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी महापालिकेत सत्ताधारी भाजपने बेळगाव हा कर्नाटकचाच भाग आहे आणि सीमावादावर महाजन अहवाल अंतिम आहे, असा ठराव संमत करावा, यासाठी कन्नड संघटना दोन महिन्यांपासून कोल्हेकुई करत आहेत. महापौरांनी हा ठराव सभागृहात मांडता येतो की नाही, यावर सरकारने निर्णय घ्यावा, असा ठराव करुन हात झटकले आहेत. त्यामुळे, कन्नड संघटनांनी आता मठाधीश आणि काँग्रेस आमदारांना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे.
मंत्री सतीश जारकिहोळी, आमदार राजू सेट यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी कार्यालयात बैठक घेतली. त्यामध्ये कन्नड संघटनांनी ठराव संमत करण्यासाठी दबाव घातला. या बैठकीत आमदार सेट यांनी घडामोडींचा अहवाल सरकारला द्यावा, असे सांगितले असले तरी ठराव आमदार सेट यांनीच मांडावा, यासाठी दबाव घालण्यात येत आहे.
एकीकडे कन्नड संघटना आमदार सेट यांच्यावर दबाव घालत असताना मराठी जनतेतूनही हा ठराव सभागृहात मांडण्यात येऊ नये, कन्नड संघटनांना पाठीशी घालू नये, यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. म. ए. युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी सोशल मीडियावरून आमदार सेट यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे, आमदार सेट दोन्ही बाजूंनी कात्रीत सापडले असून ते कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागून आहे.
सीमाप्रश्नाच्या ठरावावरून सरकारनियुक्त नगरसेवक आणि कन्नड संघटनांना कोल्हेकुई करत असल्यामुळे महापौर प्रीती कामकर जूनमध्ये सर्वसाधारण सभा घेण्याची शक्यता कमी आहे. जुलैमध्ये विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची शक्यता असल्यामुळे त्या दरम्यान सर्वसाधारण सभा होण्याची शक्यता आहे.
बेळगाव हा कर्नाटकचाच भाग आहे, असा ठराव मालिकेत मंजूर करण्यात यावा यासाठी कन्नड संघटनांकडून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मागणी केली जात आहे. कन्नड संघटनांकडून राजकीय नेत्यांवर दबाव घालून हा ठराव संमत करण्यासाठी प्रयत्न चालविले जात आहेत. पण, खासदार इराण्णा कडाडी यांनी महापालिकेत ठराव मांडण्याची गरज काय, असा सवाल करत कन्नडिगांना घरचा आहेर दिला आहे. बेळगाव हे कर्नाटकचे असताना बेळगाव महापालिकेत ठराव मांडण्याची गरज काय आहे? असा प्रश्न उपस्थित करून आपण त्यावर शंका उपस्थित करत आहोत, असे वक्तव्य खासदार कडाडी यांनी केले ओ. महापालिकेतील त्या संघटनांच्या ठरावाच्या मागण्यांबाबत कडाडी यांनी वेगळीच भूमिका मांडल्याने कन्नड संघटनांना चपराक बसली आहे.