

बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी तज्ज्ञ समिती आणि उच्चाधिकार समितीची बैठक घेण्यात यावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन करणे. मराठी फलकांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणे. यावर घटक समित्यांनी २८ मे पर्यंत बैठका घेऊन कार्यकर्त्यांची मते जाणून घ्यावीत, असे सांगत ३० मे रोजी या दोन्ही आंदोलनांची तारीख जाहीर करण्यात येईल, असा निर्धार करण्यात आला.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक बुधवारी (दि. २०) मराठा मंदिरच्या कार्यालयात झाली. मध्यवर्ती समिती अध्यक्ष प्रकाश मरगाळे अध्यक्षस्थानी होते. सीमाप्रश्नाचा दावा पुढील महिन्यात सुनावणीला येण्याची शक्यता आहे. या दाव्याच्या सुनावणीआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तज्ज्ञ आणि उच्चाधिकार समितीची बैठक घ्यावी, यासाठी सातत्याने मागणी करूनही दखल घेतली जात नाही. त्यामुळे या बैठकांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्यात यावे, अशी विनंती करण्यात आली. त्यानुसार या धरणे आंदोलनाबाबतही निर्णय घेण्यात येणार आहे.
महापालिकेकडून मराठी फलकांना टार्गेट करण्यात येत आहे. त्याविरोधात सहा महिन्यांपूर्वी डांबर मोर्चा काढण्यात येईल, असा निर्धार केला होता; पण तो मोर्चा अद्याप झालेला नाही. या मोर्चाबाबतही घटक समित्यांनी बैठकीत चर्चा करावी. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मोर्चाची सूचना देण्यात येईल, असे सांगण्यात आले. कन्नड संघटनांकडून सुरू असलेल्या कुरघोड्यांना कर्नाटक सरकार खतपाणी घालत असून, सीमाभागातील मराठी भाषिकांना डिवचण्याचे काम सुरू आहे. याविरोधात आधी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाईल आणि त्यानंतरही हा प्रकार थांबला नाही, तर म. ए. समिती आपल्या पद्धतीने हे सर्व थांबवेल, अशी प्रतिक्रिया मरगाळे यांनी दिली.
महापालिकेत कन्नड संघटनांकडून सीमाप्रश्नाविरोधी ठराव मांडण्याची तयारी सुरू असल्यामुळे सदस्यांनी बैठकीत आक्रमक मते मांडली. आंदोलनात्मक लढा हाती घेताना कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांचे मत घेणे अत्यंत गरजेचे असते. सर्व घटक समित्यांच्या बैठका होतील, असे सरचिटणीस, माजी महापौर मालोजी अष्टेकर यांनी सांगितले.
बैठकीला मध्यवर्ती समितीचे कार्याध्यक्ष, माजी आमदार मनोहर किणेकर, रणजित चव्हाण-पाटील, खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, गोपाळ पाटील, ॲड. अमर येळ्ळूरकर, लक्ष्मण होनगेकर, बी. डी. मोहनगेकर, आर. सी. मोदगेकर, ॲड. एम. जी. पाटील, एम. बी. गुरव, लक्ष्मण पाटील, शिवाजी खांडेकर, आबासाहेब दळवी, डी. बी. पाटील, मनोहर हुंदरे, विलास बेळगावकर, नारायण सांगावकर, अजित पाटील, आर. के. पाटील, रावजी पाटील, विकास कलघटगी, अनिल पाटील, राजू मरवे आदी उपस्थित होते.