Border Dispute Belgaum | अंगात षड्‌रिपुंचा प्रवेश; मठाधीशांचा मराठी द्वेष

कन्नड म्होरक्यांच्या बैठकीत कर्नाटकाच्या समर्थनार्थ प्राणत्याग करण्याची वल्गना
Border Dispute Belgaum |
Border Dispute Belgaum | अंगात षड्‌रिपुंचा प्रवेश; मठाधीशांचा मराठी द्वेष
Published on
Updated on

बेळगाव : काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर आणि मद या दोषांपासून दूर असलेले संतत्वाला पोचतात. पण, बेळगावातील मठाधिशांनी उघडपणे बेळगाव हे कर्नाटकाचे आहे. महापालिकेच कर्नाटकाच्या बाजूने ठराव झाला पाहिजे, कन्नड भाषा आणि कर्नाटकाच्या समर्थनार्थ प्राणत्याग करू, अशी वक्तव्ये करून आपल्यातील फोलपणा सर्वांसमोर दाखवून दिला आहे.

बेळगाव आणि कन्नड भाषेच्या संरक्षणासाठी कोणत्याही प्रकारचा संघर्ष करण्यास, तसेच प्रसंगी प्राणत्याग करण्यासही आपण तयार असल्याची ठाम भूमिका नागनूर येथील रुद्राक्षी मठाचे पीठाधीश डॉ. अल्लमप्रभू स्वामी यांनी व्यक्त केली. अशीच भावना हुक्केरीमठाचे चंद्रशेखर स्वामी यांनी व्यक्त केली आहे. रुद्राक्षीमठात विविध कन्नड संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची सोमवारी (दि. ८) बैठक पार पडली. यावेळी अल्लमप्रभू स्वामी यांनी बेळगाव हा कर्नाटकाचा अविभाज्य भाग असल्याचा पुनरुच्चार केला. शिवबसव महास्वामी यांनी बेळगाव कर्नाटकात राहावे यासाठी मोठा संघर्ष केला होता. त्यांनी सहन केलेल्या अत्याचारांची स्मृती ताजी आहे. अनेक वर्षांनंतर पुन्हा अशाच प्रकारच्या आंदोलनाची वेळ येणे दुर्दैवी आहे. कन्नड हितरक्षणाच्या प्रश्नांवर रुद्राक्षी मठ गेल्या अनेक दशकांपासून अग्रस्थानी राहिले आहे. बेळगाव कर्नाटकाचाच भाग असल्याबाबत कोणतीही शंका नसताना पुन्हा ते सिद्ध करण्याची वेळ येणे खेदजनक आहे, असे सांगितले.

महापालिकेने बेळगाव कर्नाटकाचाच भाग आहे, असा ठराव मंजूर करण्याबाबत घेतलेली भूमिका संशयास्पद आहे. दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला रुद्राक्षीमठाचा संपूर्ण पाठिंबा असल्याचे स्पष्ट करत या विषयावर महापौर व उपमहापौर यांच्याशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी कन्नड संघटनांचे म्होरके आणि सरकारनियुक्त नगरसेवकही उपस्थित होते. मठाधिशांनी जात, भाषाभेद बाजूला सारून समाजाच्या हिताचा निर्णय घेणे अपेक्षित असताना मराठी द्वेषावर पोसलेल्या कन्नड संघटनांच्या बाजूने वक्तव्य केले असल्यामुळे शहरात नाराजी व्यक्त होत आहे.

कुठे ते अन्‌ कुठे हे?

सीमाप्रश्न अस्तित्वात आल्यापासून अगदी नव्वदीच्या काळापर्यंत कन्नड साहित्य संमेलनांमध्ये कर्नाटकच्या मराठी भाषिकांबाबतच्या धोरणावर टीका झालेली आहे. कर्नाटकाने सीमावासीयांना कधीही आपले मानलेच नाही. म्हणून हा प्रश्न इतका दीर्घकाळ जिवंत राहिला. हा प्रश्न तातडीने सुटला पाहिजे, असा ठरावही कन्नड साहित्य संमेलनांच्या व्यासपीठावरून झालेला आहे. एकीकडे साहित्यिक मराठी भाषिकांबद्दल कणव दाखवत असताना ज्यांच्याकडून सर्व मानवजात समान अशी अपेक्षा असते, ते स्वामी-साधू पक्षपाती भूमिका घेऊ लागले आहेत. याबद्दल सीमावासीयांतून संताप व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news