राजस्थान व मध्य प्रदेशातील पाच जणांच्या आंतरराज्यीय टोळीचा कित्तूर पोलिसांनी अवघ्या दहा दिवसांत छडा लावला.  Pudhari
बेळगाव

Karnataka Robbery | कित्तूर येथील सराफी दुकान फोडणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा छडा

कित्तूर पोलिसांकडून राजस्थान-मध्य प्रदेशातील पाच चोरटे गजाआड; ७ किलो चांदीसह कार, २२ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

Kittur Interstate Gang Busted

निपाणी : कित्तूर येथील सराफी दुकान फोडून दागिने लंपास करणाऱ्या राजस्थान व मध्य प्रदेशातील पाच जणांच्या आंतरराज्यीय टोळीचा कित्तूर पोलिसांनी अवघ्या दहा दिवसांत छडा लावला. पोलिसांनी पाचही संशयितांना अटक करून त्यांच्याकडून १७ लाख रुपये किमतीचे सात किलो चांदीचे दागिने आणि पाच लाख रुपये किमतीची कार, असा एकूण २२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या उल्लेखनीय कारवाईबद्दल जिल्हा पोलीस प्रमुख के. रामराजन यांनी कित्तूर पोलिसांचे अभिनंदन केले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये नरसिंग उर्फ पवन जेठूसिंग (रा. हनुमटिया, राजस्थान), अर्जुनसिंग शिवसिंग (रा. ढाकडी, मध्य प्रदेश), दिलीपसिंग देविसिंग (रा. भिलोखावडिया, राजस्थान), लोकेश चिनमाराम मेघवाल (रा. शाहपूर, राजस्थान) आणि नरेंद्र प्रभुसिंग उर्फ प्रभुलाल गुज्जर (रा. बेवरखासा, राजस्थान) यांचा समावेश आहे.

शटरचे कुलूप तोडून चांदीचे दागिने लंपास

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ ऑगस्टच्या मध्यरात्री चोरट्यांनी कित्तूर येथील ‘मानज ज्वेलरी’ या सराफी दुकानाला लक्ष्य केले. दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर एका उपकरणाच्या साहाय्याने फर्निचर कपाटाचे कुलूप फोडून त्यातील चांदीचे दागिने लंपास केले.

१३ ऑगस्ट रोजी सकाळी दुकानाचे मालक सुब्रमण्यम मार्तंडया पत्तार दुकान उघडण्यासाठी आले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यांनी याबाबत कित्तूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

सीसीटीव्ही व तांत्रिक तपासातून माग काढला

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस प्रमुख के. रामराजन, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख आर. बी. बसरगी आणि बैलहोंगलचे डीएसपी डॉ. विरेंद्र हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला.

कित्तूरचे सीपीआय शिवानंद बी. गुडगनहट्टी, उपनिरीक्षक भरत एस., उपनिरीक्षक जी. जी. हंपणावर तसेच पोलिस कर्मचारी आणि बेळगाव टेक्निकल सेलच्या पथकाने शास्त्रीय व तांत्रिक पद्धतीने तपास केला. विविध पोलिस ठाण्यांमध्ये नोंद असलेल्या गुन्हेगारांची माहिती तपासण्याबरोबरच सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि अन्य पुराव्यांच्या आधारे संशयितांचा माग काढण्यात आला.

तपासादरम्यान पोलिस पथकाने राजस्थान आणि मध्य प्रदेशात जाऊन संशयितांचा शोध घेतला. सलग सात दिवस या भागात मुक्काम करून तपास केल्यानंतर अखेर दहा दिवसांत आंतरराज्यीय टोळीपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले.

अन्य गुन्ह्यांचा तपास सुरू

या टोळीचे जाळे कर्नाटक, राजस्थान आणि मध्य प्रदेशपर्यंत पसरले असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी अन्य भागांतही अशाच प्रकारच्या सराफी दुकानांमध्ये चोऱ्या केल्या आहेत का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

१० दिवसांत गुन्ह्याचा पर्दाफाश

सराफी दुकान फोडून चोरी करणाऱ्या या आंतरराज्यीय टोळीचा कित्तूर पोलिसांनी अवघ्या दहा दिवसांत पर्दाफाश केला. यातील सात दिवस पोलिस पथकाने राजस्थान आणि मध्य प्रदेशात मुक्काम करून संशयितांचा माग काढला. शटर व कुलूप तोडून रात्रीच्या वेळी दागिने लंपास करण्याची आरोपींची पद्धत, सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि शास्त्रीय तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपींपर्यंत पोहोचत टोळीला गजाआड केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT