

बंगळूर : बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपाखाली भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे विशेष भूसंपादन अधिकारी बी. मल्लिकार्जुन यांच्या मालकीच्या ११ ठिकाणांवर लोकायुक्त पोलिस अधिकाऱ्यांनी छापे टाकले आहेत. छाप्यादरम्यान केएएस अधिकारी बी. मल्लिकार्जुन यांच्याकडे १०० एकर जमीन असल्याचे स्प्ष्ट झाले आहे. त्यांच्याकडून २.५३ कोटी रुपये रक्कमही जप्त करण्यात आली आहे. लोकायुक्त अधिकाऱ्यांनी एकाच वेळी त्यांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या घरांवर छापे टाकले.
बंगळूर, बागेपल्ली, मालूर, चिंतामणी, चिक्कबळ्ळापूर ११ ठिकाणी कारवाई करण्यात आली. त्यात रक्कम, सोन्याचे दागिने व आलिशान वाहने जप्त करण्यात आली आहे. तसेच नातेवाईक व जवळच्या मित्रांच्या नावावर संपादित केलेल्या शंभर एकर व पाच गुंठे जमिनीशी संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
बागेपल्ली तालुक्यात मल्लिकार्जुन यांच्या मालकीची ३० एकर जमीन आहे. यामध्ये २५ एकरवर आंबा व पपई पिके आहेत. एक फार्महाऊस आहे. ब्याटरायनपूर येथील आलिशान अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या मल्लिकार्जुन यांनी आपला पगार बँकेतून काढलेला नाही. त्यांच्या मालकीची दोन घरे असून नातेवाईकांकडे १५ लाख रुपयांची वाहने, ३.१० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व १ कोटी रुपयांची बँक शिल्लक रोख आढळून आली आहे. अशी एकूण ४ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता व १२.९५ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.