बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
हुबळी- दादर, कोल्हापूर- बंगळूर चन्नम्मा एक्स्प्रेस आता पूर्ववत सुरु करण्यात आली आहे. त्याचबरोबर बेळगाव ते शेडबाळ धावणारी पॅसेंजर गाडीही सुरु करण्यात आली आहे. काही एक्स्प्रेस गाड्यासाठी आता तिकीट खिडकीही स्टेशनवर सुरु करण्यात आली असून, गेली सव्वा वर्षे ही खिडकी बंद होती. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण सुरु असल्यामुळे हुबळी ते दादर यादरम्यान धावणारी रेल्वे 5 मार्च ते 21 मार्चपर्यंत रद्द करण्यात आली होती. मात्र, हे नियोजन रद्द करण्यात आले असून 5 मार्चपासूनच ही रेल्वे नियमित धावत आहे. कोल्हापूर ते तिरुपतीदरम्यान धावणारी हरिप्रिया एक्स्प्रेस महत्त्वाच्या थांब्यावर अधिक वेळ थांबणार होती, मात्र यातही बदल केला असून ती नेहमीप्रमाणे धावणार आहे. ही रेल्वे 8 , 12 , 16 व 19 मार्च या कालावधीत काही थांब्यावर अधिक वेळ थांबणार होती .
हुबळी-दादर गाडी हुबळीहून रोज दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुटते. ती सायंकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी बेळगावला पोहोचते. तसेच दुसर्या दिवशी सकाळी 7 वाजता मुंबईला पोहोचते. त्याचबरोबर दादरहून रात्री 8 वाजून 25 मिनिटांनी निघून दुसर्या दिवशी सकाळी 11 वाजून मिनिटांनी हुबळीला पोहोचते. आता ही रेल्वे नेहमीप्रमाणे धावणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे. काल 5 मार्चपासून आठ दिवस बंद असलेली बेळगाव-शेडबाळ-बेळगाव पॅसेंजर पूर्ववत सुरु करण्यात आली आहे. ही गाडी सकाळी 9 वा. बेळगावहून सुटून सकाळी 11.30 वा. शेडबाळमध्ये पोहचते. त्यानंतर दुपारी 12 वा. सुटून ही पॅसेंजर दुपारी अडीच वाजता बेळगावला पोहचते.काही एक्सप्रेस गाड्यासाठीही आता रेल्वे स्टेशनवर तिकीट खिडकी सुरु करण्यात आली आहे. ही तिकीट खिडकी गेली सव्वा वर्षे बंद होती. बेळगावमध्ये बेळगाव-बंगळूर एक्सप्रेस, कोल्हापूर- तिरुपती एक्सप्रेस, हुबळी- दादर एक्सप्रेस यासह अणखी काही गाड्यांचे जनरल तिकीट आता रेल्वे स्टेशनवर मिळणार आहे.
गेली दीड वर्षे बंद असलेली रेल्वे प्रवाशांची पास सेवा आता सरु करण्यात आली आहे. तिकीट खिडकीमध्ये ही सोय करण्यात आली आहे. यामुळे नियमित प्रवास करणार्या प्रवाशाना, विद्यार्थ्यांना, नोकरदार वर्गाला दिलासा आता मिळाला आहे.