Dog Attack Pudhari
बेळगाव

Dog Bite Cases belgaum : सहा महिन्यांत १४,११० जणांना कुत्र्यांचा चावा; बेळगाव जिल्ह्यातील आकडेवारी

रेबीजने दोघांचा मृत्यू; गोकाक तालुक्यात सर्वाधिक रुग्ण

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : जिल्ह्यात भटक्या आणि पाळीव कुत्र्यांच्या चावण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली असून, यंदाच्या जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत तब्बल १४ हजार ११० जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची नोंद झाली आहे. याच कालावधीत बेळगाव आणि बैलहोंगल तालुक्‍यातील प्रत्येकी एका व्यक्तीचा रेबीजमुळे मृत्यू झाल्याने सार्वजनिक आरोग्याचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष निवारा केंद्र उभारण्याची तयारी सुरू केली आहे.

जिल्हा आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, गोकाक तालुक्यात सर्वाधिक २ हजार १०६ कुत्र्या चावल्याच्या घटनांची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ बेळगाव तालुक्यात २ हजार ४६२, चिक्कोडीमध्ये १ हजार ६६८ आणि अथणीमध्ये १ हजार ६१२ रुग्णांची नोंद झाली आहे. बैलहोंगल तालुक्यात सर्वात कमी ४९९ घटना नोंदविण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार ही आकडेवारी केवळ सरकारी रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांची असून, खाजगी रुग्णालयातील रुग्णांचा यात समावेश नाही. त्यामुळे प्रत्यक्षातील घटनांची संख्या यापेक्षाही अधिक असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. एस. गडाद यांनी सांगितले की, कुत्रा चावल्यानंतर संबंधित कुत्रा भटक्या असो किंवा पाळीव, रुग्णाला तातडीने रेबीज प्रतिबंधक लस दिली जाते. काही प्रकरणांमध्ये प्राण्यांच्या लाळेशी संपर्क आल्यासही प्रतिबंधत्मक लसीकरणाचा सल्ला दिला जातो. यासोबतच नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध मोहिमाही राबविण्यात येत आहेत. त्यांनी पुढे सांगितले की, लहान मुले, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, पादचारी आणि दुचाकीस्वार हे कुत्र्यांच्या हल्ल्याचे सर्वाधिक बळी ठरत आहेत. रेबीजची लक्षणे दिसून लागल्यानंतर हा आजार जवळपास नेहमीच प्राणघातक ठरतो. त्यामुळे कुत्रा चावल्यानंतर जखम साबण आणि स्वच्छ वाहत्या पाण्याने किमान १५ मिनिटे धुवून तातडीने वैद्यकीय उपचार घेणे अत्यंत आवश्यक आहे.

दरम्यान, पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय सेवा विभागाचे उपसंचालक डॉ. रवी सालिगौडर यांनी शहरी व ग्रामीण भागात भटक्या कुत्र्यांच्या लसीकरणासाठी विशेष मोहीम सुरू असल्याची माहिती दिली. शहरी भागात प्राणी जन्म नियंत्रण संस्थांमार्फत, तर ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहकार्याने लसीकरण केले जात असून विभागाकडून आवश्यक लसींचा पुरवठा केला जात आहे.

भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या समस्यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बेळगाव महानगरपालिकेसाठी भटक्या कुत्र्यांचे विशेष निवारा व काळजी केंद्र उभारण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दोन एकर जागा मंजूर केली आहे. हे केंद्र कार्यान्वित झाल्यानंतर भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यास मदत होईल आणि कुत्रा चावण्याच्या घटनांमध्येही लक्षणीय घट होण्याची अपेक्षा आहे. जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नांतून ही समस्या आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.
- मोहम्मद रोशन, जिल्हाधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT