

dog bite compensation
नवी दिल्ली : कुत्र्याने चावा घेतल्याप्रकरणी आपल्याला २० लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी, यासाठी महिलेने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने २०२३ मध्ये तयार केलेल्या सूत्राच्या आधारे भरपाई मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली महानगरपालिकेला (एमसीडी) म्हणण सादर करावे, असे निर्देश दिले आहेत. जाणून घेऊया, कुत्रा चावल्याच्या प्रकरणी उच्च न्यायालयाने यापूर्वी कोणते निकष ठरवले आहेत याविषयी...
मार्च २०२५ मध्ये त्या दक्षिण दिल्लीतील मालवीय नगरमधील खिरकी व्हिलेज रोडवरून प्रियांका राय दुचाकीवरून जात होत्या. त्या दुचाकीच्या मागे बसल्या होत्या. यावेळी अचानक रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या प्रकरणी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे की, भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे शारीरिक, भावनिक आणि आर्थिक नुकसान सहन करावं लागलं. तसेच नुकसानाची रक्कम निश्चित करण्यासाठी त्यांनी २०२३ मध्ये पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने नुकसानभरपाईसाठी ठरवलेल्या सूत्रांचा हवाला दिला आहे.
कुत्रा चावल्याच्या प्रकरणी १८ ऑगस्ट २०२३ रोजी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विनोद एस. भारद्वाज यांनी निकालात म्हटलं होतं की, नुकसानभरपाईची रक्कम ही पीडितेला कुत्र्याने किती दातांनी चावले, त्वचेवरून मांस काढले का, यावर अवलंबून असेल. कुत्र्यांच्या चाव्या आणि इतर प्राण्यांच्या हल्ल्यांशी संबंधित १९३ रिट याचिकांवर हा आदेश देण्यात आला होता.
न्यायालयाने पंजाब, हरियाणा आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडला गायी, बैल, गाढवे, कुत्रे, नीलगाय आणि म्हशी तसेच वन्य, पाळीव आणि भटक्या प्राण्यांमुळे होणाऱ्या अपघातांसाठी भरपाई मोजण्याचे निर्देश दिले होते. हे दावे दाखल झाल्यापासून चार महिन्यांच्या आत निकाली निघावेत, असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते. या निकालाच्या आधारे प्रियांका राय यांनी मागणी केली आहे की, १२ सेमीच्या एकूण जखमेसाठी १२ लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी. कारण उच्च न्यायालयाने प्रत्येक ०.२ सेमी जखमेच्या प्रत्येकी २०,००० रुपये देण्याचे ठरवले आहे. प्रत्येक दाताच्या खूणासाठी १०,००० रुपये दराने अतिरिक्त ४.२ लाख रुपये मागितले, असा दावा करत माझ्यावर झालेल्या कुत्र्याने सर्व ४२ दातांनी चावा घेतला. तसेच दुखापतीसाठी भरपाई म्हणून ३.८ लाख रुपये मागितले आहेत, ज्यामुळे त्यांचा एकूण दावा २० लाख रुपये झाला आहे.