

अंबरनाथ : नगरपरिषदेच्या वतीने विविध उपाय योजना करून देखील अंबरनाथमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या कमी झालेली नाही. त्याचाच परिणाम म्हणून की काय, मागील वर्षात तब्बल ७ हजार ५९३ नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. यामध्ये भटक्या कुत्रांनी नखे लावणे, दात लागणे व गंभीर चावा घेतल्याचा समावेश आहे. एवढेच नाही तर दोन महिन्यांपूर्वी एकाचा रेबीजने मृत्यू झाला असतानाही पालिका या भटक्या कुत्र्यांबाबात गंभीर नसल्याचेच दिसून येत आहे.
अंबरनाथ शहरात भटक्या श्वानांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शहरात अंदाजे आठ हजार पेक्षा जास्त भटके श्वान असल्याचा अंदाज अंबरनाथ नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने वर्तवला आहे. भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेने श्वान निर्बीजीकरण केंद्र देखील सुरू केले आहे. मात्र त्यानंतर देखील श्वानांची संख्या कमी झालेली दिसून येत नाही. त्यामुळे या केंद्राच्या कार्यावर नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने विशेष लक्ष केंद्रित करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार भटक्या कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी खाऊ घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यासाठी नगरपालिकेच्या वतीने अंबरनाथ शहरात भटक्या श्वानांना अन्न पदार्थ खावू घालण्यासाठी प्रत्येक प्रभागात फीडींग स्पॉट तयार करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार प्राणी मित्रांना त्या त्या भागात जागा सुचवण्याचे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र हे काम अद्याप प्रलंबित आहे.
निर्बीजीकरण, रेबिज प्रतिबंधक लसीकरण वाढवा
भटक्या श्वानांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करणे व त्यांना रेबीज प्रतिबंधक लस टोचणे यासाठी प्रति श्वान-१४५० रुपये, जखमी, पिसाळलेल्या श्वानांवर उपचार करणे, प्रति श्वान ५९० रुपये, भटक्या श्वानांना फक्त रेबीज प्रतीबंधक लस टोचणे प्रति श्वान ३०० रुपये, प्रभाग निहाय रेबिज लसिकरण शिबीर राबवून भटक्या श्वानांना फक्त रेबिज प्रतिबंधक लस टोचणे प्रति श्वान १०० रुपये रक्कम अंबरनाथ नगरपालिका संबंधित संस्थेला अदा करणार आहे.
नगरपालिकेने निर्बीजीकरण केंद्र देखील सुरू केले आहे. भटक्या श्वानांसाठी फिडिंग स्पॉट देखील निर्माण केले जाणार आहेत. याबाबत लवकरच मिटिंग घेऊन भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणावर आवश्यक उपाययोजना केली जाईल.
उमाकांत गायकवाड , मुख्याधिकारी