

Dog bite case : अर्पाटमेंट असो की सोसायटी, अनेकवेळा पाळीव कुत्र्यांमुळे झालेली भांडण आपण पाहिली असतील. अशाच एका प्रकरणी कुत्रा पाळणारे आणि त्यांच्यामुळे त्रस्त असणार्या शेजार्यांसाठी महत्त्वपूर्ण निकाल मुंबईतील न्यायालयाने दिला आहे. शेजार्याला चावणार्या कुत्र्याच्या मालकाला न्यायालयाने चार महिन्यांच्या सक्तमजुरीसह आर्थिक दंडही ठोठावला आहे. दोन्ही शिक्षा एकाचचेळी लागू होतील. दंड न भरल्यास कुत्र्याच्या मालकाला अतिरिक्त १५ दिवसांची शिक्षा भोगावी लागेल, असे स्पष्ट करत अंतिम निर्णयानंतर दंडाची रक्कम पीडितेला भरपाई म्हणून देण्याचे आदेशही न्यायालयाने दिला आहे.
हे प्रकरण आहे २०१८ मधील. मुंबईतील वरळी येथील अल्फा अपार्टमेंटमध्ये ऋषभ मौशिक पटेल राहतात. त्यांनी व्यक्तीच्या हस्की जातीच्या कुत्रे पाळले होते. त्यांचे शेजारी रमिक शहा यांना या कुत्र्याने लिफ्टमध्ये चावा घेतला. या प्रकरणी रमिक यांनी वरळी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, संशयित आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 324 (जाणूनबुजून दुखापत), 289 (पाळीव प्राण्यांच्या संबंधात निष्काळजीपणा) आणि 506 (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सीसीटीव्ही फुटेज, वैद्यकीय अहवाल आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे सरकारी वकिलांनी न्यायालयात आरोपीची भूमिका सिद्ध केली. त्याच वेळी, बचाव पक्षाने व्हिडिओ फुटेजच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच दोन्ही कुटुंबातील मतभेदाचा हवाला देत सर्व आरोप निराधार असल्याचा दावा केला.
प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर न्यायालयाने आरोपीला आयपीसीच्या कलम 324 आणि 289 अंतर्गत दोषी ठरवले, परंतु पुरेशा पुराव्याअभावी कलम 506 अंतर्गत त्याची निर्दोष मुक्तता केली. न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग सुहास विजय भोसले यांनी स्पष्ट केले की, "वारंवार इशारा देऊनही आरोपीने कुत्र्याला जबरदस्तीने लिफ्टमध्ये ओढले आणि पीडितेवर सोडले. आरोपीने केवळ त्याच्या पाळीव कुत्र्याबद्दल संवेदनशीलता दाखवली नाही तर लिफ्टमध्ये आधीच उपस्थित असलेल्या व्यक्तीची, त्याच्या दीड वर्षाच्या मुलाची आणि घरकाम करणाऱ्या नोकराचीही पर्वा केला नाही. घटनेच्या वेळी पीडितेचा दीड वर्षाचा मुलगाही लिफ्टमध्ये उपस्थित होता. आरोपीने ज्या पद्धतीने कुत्र्याला जबरदस्तीने आत ओढले त्यावरून हे सिद्ध होते की, तो त्याच्या पाळीव प्राण्याबद्दल संवेदनशील नाही किंवा त्याला इतर लोकांच्या सुरक्षिततेची जाणीव नाही. अशा परिस्थितीत आरोपीला जास्त दया दाखवता येणार नाही."
न्यायालयाने आरोपीला आयपीसी कलम 324 आणि 289 अंतर्गत दोषी ठरवले. कलम 324 अंतर्गत न्यायालयाने चार महिने सक्तमजुरी आणि 3,000 रुपये दंड ठोठावला. आयपीसीच्या कलम 289अंतर्गत तीन महिने सक्तमजुरी आणि १,००० रुपये दंडाची शिक्षाही ठोठावण्यात आली आहे. दोन्ही शिक्षा एकाचचेळी लागू होतील. दंड न भरल्यास कुत्र्याच्या मालकाला अतिरिक्त १५ दिवसांची शिक्षा भोगावी लागेल. अंतिम निर्णयानंतर दंडाची रक्कम पीडितेला भरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.