पुढारी वृत्तसेवा : संकेश्वर
हत्तरगीनजीक नरसिंगपूर-बेनकनहळ्ळी राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याशेजारी थांबलेल्या कंटेनर ट्रकला मागून कारने जोराची धडक देऊन झालेल्या अपघातात संकेश्वर येथील माय-लेक जागीच ठार झाल्या, तर एक गंभीर जखमी झाला. रविवारी सायंकाळी 4.30 वाजता हा अपघात झाला. अपघातात संकेश्वरचे नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. सचिन शिवानंद मुरगुडे गंभीररीत्या जखमी झाले असून, त्यांची पत्नी डॉ. श्वेता मुरगुडे (वय 38) आणि कन्या शिया (वय 7) यांचा जागीच मृत्यू झाला. डॉ. सचिन यांंची स्थिती चिंताजनक आहे.
संकेश्वरचे नेत्ररोगतज्ज्ञ सचिन मुरगुडे रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे कारने धारवाडनजीकच्या आगडीतोट येथील पुरातनकालीन वस्तू संग्रहालय पाहण्यास गेले होते. तेथून ते संकेश्वरला परतत असताना पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील नरसिंगपूर बेनकनहळ्ळी येथे रस्त्याशेजारी थांबलेल्या कंटेनरला त्यांच्या कारची जोरात धडक बसली. यामध्ये त्यांची पत्नी व मुलगी जागीच ठार झाली. डॉ. सचिन मुरगुडे गंभीर जखमी झाले असून त्यांना बेळगाव केएलई इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. डॉ. सचिन यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांची स्थिती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
कार भरधाव येऊन कंटेनरला धडकल्याने कारचा समोरील भाग चक्काचूर झाला आहे. डॉ. सचिन यांचा कारवरील ताबा सुटल्याने कंटेनरला धडक बसल्याचे बोलले जात आहे. यमकनमर्डी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रमेश छायागोळ, पोलिस उपनिरीक्षक न्यामगौडा यांनी घटनास्थळी पाहणी करून गंभीर जखमी डॉ.मुरगुडे यांना हॉस्पिटलला पाठविले. यमकनमर्डी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.
डॉ. सचिन यांचे वडील डॉ. शिवानंद मुरगुडे यांचा कोरोनाच्या दुसर्या लाटेत कोरोनाने मृत्यू झाला होता. रविवारच्या अपघातात डॉ. सचिन यांची पत्नी डॉ. श्वेता व कन्या शिया यांचा मृत्यू झाला.