पुणे : पुढारी वृत्तसेवा
पुण्यात राज्यसेवा परीक्षेची तयारी करणार्यासाठी आलेल्या तरूणाने मौजमजेसाठी एका बँकेत काम करणार्या कर्मचार्याचे अपहरण करून त्याच्या मोबाईलवरील फोन पे चा पासवर्ड जबरदस्तीने घेऊन 67 हजार रूपये ट्रान्सफर करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी एकाला अटक केली असून त्याला दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
गणेश निवृत्त दराडे (24, सध्या रा. कर्वेनगर, मूळ रा. बीड ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत रोहीत पवार (रा. ता. पुरंदर, जि. पुणे) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी पवार हे अलिबाग येथील एसबीआय बँकेत कनिष्ठ सहयोगी पदावर कार्यरत आहे. तर अटक करण्यात आलेला गणेश दराडे हा बीड येथील रहिवासी असून, तो पुण्यात एमपीएसीचे क्लासेस करतो. त्याच्या घरी परिस्थिती बेताची असून वडील उस तोडण्याचे काम करतात. रोहीत पवार हे साप्ताहिक सुटीसाठी पुरंदर येथे दुचाकीवर चालले असताना दि. 18 फेब्रुवारी रोजी ते साडे अकरा वाजण्याच्या सुमारास स्वारगेट एसटीस्टँड जवळ दुचाकीवर थांबले होते. त्यावेळी दराडे आणि त्याचा साथीदार तेथे आला. दोघांनी त्यांना मारहाण करून जबरदस्तीने त्यांच्याच दुचाकीवर बसवले. नंतर ते त्याला मुकुंदनगर येथील सत्यम शिवम बंगल्यासमोर घेऊन गेले.
तेथेही त्यांना मारहाण करून रोहीत यांच्या मोबाईलमधी फोन पे चा पासवर्ड घेतला. त्या आधारे त्यांनी रोहीत यांच्या खात्यातून तब्बल 67 हजार रूपये ट्रान्सफर करून घेतले. तांत्रिक विश्लेषणावरून गुन्हा दाखल होताच. काही तासांच्या आत दराडेला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्याच्या साथीदाराचाही शोध सुरू असल्याचे गुन्ह्याचे तपास अधिकारी गुन्हे निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी सांगितले.