ब्रिसबेन; पुढारी ऑनलाईन डेस्क : पॅट कमिन्सने ऑस्ट्रेलियन कर्णधार पदाची जबाबदारी लिलया पेलत ॲशेस कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या दिवशीच इंग्लंड संघाला लोळवले (aus vs eng ashes 1st test 1st day). कमिन्सने भेदक मारा करत पाहुण्या संघाला तडाखा दिला. त्याने निम्मा संघ तंबूत पाठवून इंग्लंडचा पहिला डाव १४७ धावांवर गुंडाळण्यात मोलाचे योगदान दिले. तर मिचेल स्टार्क आणि जोश हेजलवूड यांनी २-२ तर कॅमरून ग्रीनने १ गडी बाद केला. इंग्लंडचा डाव आटोपल्यानंतर पाऊस आला. खराब हवामान आणि ओल्या आउटफिल्डमुळे तिसरे सत्र खेळता आले नाही, त्यामुळे ऑस्ट्रेलियाला गुरुवारी सकाळी पहिला डाव सुरू करावा लागणार आहे. इंग्लंडकडून जोस बटलर (३९), ऑली पोप (३५), हसीब हमीद (२५) आणि ख्रिस वोक्स (२१) यांनी दुहेरी धावांचे योगदान दिले. तर तीन फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही.
तत्पूर्वी, ब्रिसबेनच्या गाबा मैदानावर इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर समालोचकाशी बोलताना त्याने पहिला फलंदाजी करून मोठी धावसंख्या उभारण्याचा मानस व्यक्त केला. त्यानंतर सलामीवीर रॉरी बर्न्स आणि हसीब हमीद मोठ्या आत्मविश्वासाने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा सामना करण्यासाठी मैदानात उतरले. पण मिचेल स्टार्कने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर पाहुण्या संघाचे स्वप्न धुळीस मिळवले. त्याने डावखु-या रॉरी बर्न्सला स्विंग यॉर्कवर क्लिन बोल्ड करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर हेझलवूडने चौथ्या षटकात डेव्हिड मलान (६) आणि सहाव्या षटकात जो रूट (०) यांना बाद करत इंग्लंडचे कंबरडे मोडले. यावेळी इंग्लंडची अवस्था तीन बाद ११ अशी झाली. (aus vs eng ashes 1st test 1st day)
यानंतर १२.४ व्या षटकात पॅट कमिन्सने स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सला तिसर्या स्लीपमध्ये लॅबुशेनच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. यावेळी इंग्लंडची धावसंख्या चार विकेटवर २९ झाली. एकाबाजूने विकेट्स पडत असताना हसीब हमीदने संयमी खेळी केली आणि उपाहारापर्यंत इंग्लंडची धावसंख्या ४ बाद ५९ पर्यंत पोहचवली. पण तो दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला २६.४ व्या षटकात कमिन्सच्या चेंडूवर स्टीव्ह स्मिथच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. पोप आणि बटलर यांनी सहाव्या विकेटसाठी ५२ धावांची भागीदारी केली आणि काही काळ इंग्लंची पडझड थांबवण्याचा प्रयत्न केला. यानंतर ४०.३ व्या षटकात स्टार्कने बटलरला यष्टिरक्षक अॅलेक्स कॅरीकडे झेलबाद करून ही भागीदारी तोडली. तर ४३.१ व्या षटकात ग्रीनच्या चेंडूवर ऑली पोप फाइन लेग बाऊंड्रीवर झेलबाद झाला. ग्रीनची ही पहिलीच कसोटी विकेट होती. त्यानंतर कमिन्सने ऑली रॉबिन्सन (०), मार्क वुड (८) आणि ख्रिस वोक्स (२१) यांना बाद करून इंग्लंडचा पहिला डाव १४७ धावांत संपवला. (aus vs eng ashes 1st test 1st day)
या वर्षात इंग्लंडचे टॉप-७ फलंदाज २९ वेळा शून्यावर बाद झाले आहेत. हा जागतिक विक्रम आहे. यापूर्वी १९८८ मध्येही इंग्लंडचे फलंदाज सर्वाधिक २७ वेळा शून्यावर बाद झाले होते. २३ वर्षांनंतर संघाच्या नावावर पुन्हा एकदा लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.