Latest

…अखेर मणिपूरहून ‘ती’ पोहचली सुखरूप; बारामतीच्या अश्वगंधाने सांगितला थरकाप उडविणारा अनुभव

अमृता चौगुले

बारामती; पुढारी वृत्तसेवा : स्थानिक नागरिकांच्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या वातावरणामुळे मणिपूर सोडून आसाम राज्यात आश्रयासाठी जावे लागले. तब्बल पाच दिवस कर्फ्यू लावण्यात आला होता. इंटरनेटसह इतर सुविधा बंद होत्या, अशा शब्दांत मणिपूर येथे शिक्षणास असलेल्या बारामतीच्या अश्वगंधा पारडे या विद्यार्थिनीने तिचा काळजाचा थरकाप उडविणारा अनुभव सांगितला.

बारामतीमधील तांबेनगर येथील अश्वगंधा पारडे ही विद्यार्थिनी आहे. ती मंगळवारी (दि. ९) पुण्यात दाखल झाली. ती म्हणाली, मी पुण्यातील गरवारे कॉलेजची माजी विद्यार्थिनी आहे. सध्या नॅशनल स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी इम्फाळ येथे स्पोर्ट्स सायकॉलॉजी या विषयाचे गेल्या दोन वर्षांपासून शिक्षण घेत आहे. माझे शिक्षण पूर्ण होत आले असून, केवळ परीक्षा देणे बाकी आहे. परंतु, भारतातील विविध ठिकाणांहून मणिपूरमध्ये गेलेले विद्यार्थीच नाही, तर मणिपूरमधील अनेक स्थानिक नागरिकसुद्धा मणिपूर सोडून आसाम राज्यात आश्रयासाठी गेले होते. सुमारे चार ते पाच दिवस येथे प्रचंड घबराटीचे वातावरण होते आणि परिस्थिती चिघळलेली होती, अशा वातावरणात मिळेल तेवढा भात व भाजी खाऊन आम्ही कसेबसे दिवस काढले. प्रत्यक्षात नाही; पण तेथील गंभीर प्रसंगांचे व्हायरल झालेले व्हिडीओ पाहून काळजाचा थरकाप होत होता. आमच्या होस्टेलच्या गेटसमोर ग्रेनाइट फुटून मोठी आग लागले आम्ही पाहिल्याचे अश्वंगधाने सांगितले.

अश्वगंधा पुढे म्हणाले, मणिपूर हिंसाचाराने होरपळून निघाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. सर्वसामान्य नागरिकांना घराबाहेर पडण्यासारखी परिस्थिती नव्हती. त्यामुळे विद्यार्थीसुद्धा विद्यापीठात अडकून पडले होते. आमच्या कॅम्पसमध्ये लष्कर आणि एनएसजीचे कमांडर आल्यानंतर परिस्थिती काही प्रमाणात निवळली. आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी पाच दिवस अत्यंत भीतीच्या वातावरणात काढले. बाहेर पडता येत नसल्याने जेवण म्हणून केवळ भात व भाजी मिळत होती. दरम्यानच्या काळात महाराष्ट्र शासन व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मणिपूरमध्ये अडकलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सोडविण्यासाठी हालचाली केल्या. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राने केलेले प्रयत्न नक्कीच वाखाणण्याजोगे होते. आम्हाला राज्यात परत आणण्यासाठी प्रयत्न केलेल्या प्रत्येकाचे आभार मानते, असेही अश्वगंधा पारडे हिने सांगितले.

आम्हाला तेथून पोलिस बंदोबस्तात विमानाने गुवाहाटीमार्गे मुंबईपर्यंत आणले. मी मंगळवारी पुण्यात सुखरूप पोहचले. मणिपूरहून परत घरी आल्यावर सुटकेचा नि:श्वास सोडला. माझे वडील डॉक्टर असून, आई गृहिणी आहे. मला परत घरी आलेले पाहून त्यांना खूप आनंद झाला. परिस्थितीत सुधारणा झाल्यावर येत्या २१ जून रोजी मला परीक्षा देण्यासाठी पुन्हा माणिपूरला जावे लागणार आहे. माझ्या दोन विषयांची परीक्षा २१ जून रोजी आहे. तेवढ्या दोन विषयांच्या परीक्षेसाठी जावे लागणार आहे. कॉलेज ऑनलाईन परीक्षा घेण्यास तयार नाही. परिस्थिती न निवळल्यास परीक्षा पुढे ढकलण्याची शक्यता आहे, असेही अश्वगंधा म्हणाली.

अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT