पुढारी ऑनलाईन डेस्क : राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा मुंबईत रविवारी (दि.१८) समारोप झाला. यावेळी झालेल्या जाहीर सभेत राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात भाजप नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार हल्ला केला. मात्र, त्यांचा थेट नामोल्लेख केला नव्हता. राहुल गांधी यांच्या टीकेनंतर आता अशोक चव्हाण यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
"भाजपमध्ये जाण्यापूर्वी हा नेता सोनिया गांधी यांना भेटला. सत्ताधारी लोकांविरोधात लढण्याची माझ्यात हिंमत नाही, मी जेलमध्ये जाऊ इच्छित नाही," असे राहुल गांधी यांनी सांगितले. काँग्रेस पक्ष सोडताना ते अक्षरशः रडले, असेही राहुल गांधी म्हणाले होते. यावर अशोक चव्हाण आज (दि.१८) नांदेड येथे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, "त्यांनी (राहुल गांधी) कोणाचेही नाव घेतलेले नाही, तरीही त्यांनी माझ्यावर काही भाष्य केले असेल तर ते अतार्किक आणि निराधार आहे. मी सोनिया गांधींना दिल्लीत भेटलो हे देखील खोटे आहे. हे वक्तव्य वस्तुतः चुकीचे आहे. हा सगळा राजकीय स्टंट आहे. त्यांच विधान दिशाभूल करणार आहे," असे चव्हाण यांनी म्हटले आहे.
अनेक पक्षाचे नेते आपला मूळ पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. त्यांना या पक्षाच्या ध्येयधोरणाशी काही देणे-घेणे नाही. केवळ जेलवारी टाळण्यासाठी ईडीच्या भीतीने ते गेले आहेत, असा हल्लाबोल काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी रविवारी केला. ईडी, सीबीआय आणि ईव्हीएमचा भाजपकडून गैरवापर होत आहे. ईव्हीएमशिवाय ते निवडणूक जिंकू शकत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली. राहुल गांधी म्हणाले, भाजपकडे भ्रष्टाचाराची मक्तेदारी आहे. 'पैसे द्या, कंत्राट घ्या' अशी पॉलिसी देशभरात सुरू केली आहे. या सरकारच्या मागे एक सर्वात मोठी शक्ती आहे. ती म्हणजे देशातील उद्योगपती. सर्वसामान्य जनतेकडून आवाजवी कर वसुली केली जात असताना या उद्योगपतींवर मात्र सवलतीचा वर्षाव केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला.
भाजपमध्ये जाणार्यांची संख्या वाढली आहे. सर्व पक्षातील नेते भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. याचा अर्थ भाजपच्या तत्त्वांच्या आणि धोरणाच्या प्रेमात पडून ते जात नाहीत तर जेलवारीला घाबरून ते पक्षांतर करीत आहेत. अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात. त्यांना तुरुंगात पाठवण्याची धमकी दिली जाते. अक्षरशः गळा पकडून त्यांना घाबरवून सोडले जाते, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे.
हेही वाचा :