आजवर भाऊ म्हणून तुझं ऐकलं, पण आता नाही; अजित पवारांविरोधात सख्या भावाचा एल्गार | पुढारी

आजवर भाऊ म्हणून तुझं ऐकलं, पण आता नाही; अजित पवारांविरोधात सख्या भावाचा एल्गार

बारामती : पुढारी वृत्तसेवा :  आजवरच्या वाटचालीत भाऊ म्हणून तुझं सगळं ऐकलं पण आता नाही, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात सख्ये बंधू श्रीनिवास पवार यांनीच दंड थोपटले आहेत. भावजय शर्मिला पवार यांनीही या कटू प्रसंगात आपल्याला साहेबांच्या मागे उभे राहावे लागले असे सांगितले. पवारांच्या काटेवाडी गावात त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी श्रीनिवास पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पाठिंबा असल्याचे जाहीर करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जळजळीत टीका केली. श्रीनिवास व शर्मिला यांचे पुत्र युगेंद्र यांनी यापूर्वीच शरद पवार यांच्या बाजूने जाहीर भूमिका घेतली आहे. त्यानंतर आता सख्खा भाऊ व भावजय यांनी अजित पवार यांची साथ सोडत शरद पवार यांच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.

शरद पवारांनी काय दिले नाही ?

श्रीनिवास पवार म्हणाले की, तुम्हाला आश्चर्य वाटले असेल की मी दादांच्या विरोधात कसा ? मी नेहमीच भाऊ म्हणून त्यांना साथ दिली आहे. तो म्हणेल तशी उडी मारली आहे. पण आता जेव्हा आमची चर्चा झाली तेव्हा मी तुझ्याकडे आमदारकी आहे तर खासदारकीला साहेब म्हणतील तसे केले पाहिजे, असे सांगितले. साहेबांचे आमच्यावर असलेले उपकार सगळ्यांना माहित आहेत. ज्या साहेबांनी पंचवीस वर्षे मंत्री केले, चार वेळा उपमुख्यमंत्री केले. तरीसुद्धा काकांनी माझ्यासाठी काय केले? असे म्हणायचे. असा काका मला असता तर. मी खुश झालो असतो. असे म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले.

यासारखा नालायक माणूस नाही…

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे वय झाले म्हणून त्यांना सोडणे मला पटलेले नाही. मला काही व्यक्ती म्हणाल्या इथून पुढची वर्ष दादांची आहेत, साहेबांची नाहीत, हा विचार मला वेदना देऊन गेला. पुढच्या काही वर्षात दुसऱ्या व्यक्तीकडून आपल्याला लाभ मिळणार आहे. म्हणून वय झालेल्या व्यक्तीची आपण किंमत करत नाही. यासारखा नालायक माणूस नाही, अशा शब्दात श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. माझे मित्र मला न सांगता तिकडे गेले अशी टीका त्यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांचे नाव न घेता केली.

नात्यालाही एक्सपायरी डेट असते का ?

आपण औषध विकत आणतो त्याला एक्सापयरी डेट असते. तशी नात्याला एक्सपायरी डेट असते का असा सवाल करून श्रीनिवास पवार म्हणाले, मला दबून जगायचे नाही तर स्वाभिमानाने जगायचे आहे.  जे लाभार्थी आहेत त्यांच्या मागे मला जायचे नाही. त्यांना सुद्धा झोप लागत असेल असे मला वाटत नाही.

भाजपकडून शरद पवारांना संपविण्याचा प्रयत्न

श्रीनिवास पवार म्हणाले, भाजपने शरद पवार यांना संपविण्याचा खूपदा प्रयत्न केला. घरातला कोणी तरी फोडल्याशिवाय घर संपत नाही हा इतिहास आहे. घर एक असेल तर ते कोणीही संपवू शकत नाही असे ते म्हणाले.

कोणालाही रेकाॅर्डींग पाठवा, घाबरत नाही

माझे हे बोलणे रेकॉर्डिंग करत असाल तर मला देणे घेणे नाही. तुम्ही कोणाला पाठवायचे ते पाठवा. मी कोणालाही घाबरत नाही. मी कुणाकडेही लाभार्थी म्हणून जाणार नाही. शरद पवार जर दहा वर्षांपूर्वीचे असते. तर त्यांनी काय केले असते हे तुम्हाला ठाऊक आहे. वय वाढले म्हणून तुम्ही वयस्कर माणसाला कमजोर समजू नका असेही ते म्हणाले.

शरद पवारांमुळेच ओळख : शर्मिला पवार

अजित पवार यांच्या सख्या भावजय शर्मिला पवार म्हणाल्या, आपल्याला काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. हा काळ संवेदनशील आणि दुःखदायक आहे. तुम्ही सर्वजण कुटुंबाचा भाग आहात. कोणाला विरोध करायचा नाही. कुटुंब म्हटलं की भांड्याला भांडे लागते. पण आपल्या कुटुंबात आजवर जे घडले नाही ते आता घडले आहे.  त्यावर आपण मात करतो आहोत. आपल्या सगळ्यांच्या घरी वडीलधारी माणसे आहेत. आपली ओळख शरद पवारांमुळे आहे. विरोधकही त्यांचे नाव काढतात. त्यांनी आपल्यासाठी काय केले हा प्रश्न विचारणे म्हणजे आपल्या आई-वडीलांनी आपल्यासाठी काय केले ? असे म्हणण्यासारखे आहे. शरद पवार यांनी  इतक्या वर्षात मात खाल्ली आहे का ‌? आपण त्याला कारणीभूत व्हायचे का? आपण त्याला गालबोट लावायचे का.? कोणाला यश मिळते हा मुद्दाच नाही. आपणाला फक्त साहेबांना विजयी करायचं आहे.

 

हेही वाचा

Back to top button