तासगाव; पुढारी वृत्तसेवा : येथील शिवार कृषी प्रदर्शनामध्ये पशुप्रदर्शनाला आता चांगलीच रंगत आली आहे. डॉगशोनंतर आता विविध जातीची बैल, गाय, रेडा, म्हैस बघून लोक अवाक होत आहेत. मात्र यासोबतच याठिकाणी आलेला सोळाशे किलो वजनाचा रेडा मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेवू लागला आहे.
शिवार कृषी प्रदर्शन हे गेली आठ वर्षे तासगावच्या शेतकर्यांना त्यांच्या मालाची विक्री व शेतीमधील नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करुन देण्यासाठीचे व्यासपीठ उपलब्ध करुन देत आहे.
गेली अनेक वर्षे या प्रदर्शनात डॉग शो, पशुप्रदर्शन घेतले जात आहे. यंदा या प्रदर्शनामध्ये दीड टन वजनाचा रेडा सर्वाचे आकर्षण ठरला आहे. मात्र प्रत्यक्षात त्याचे वजन सोळाशे किलो इतके आहे.
तब्बल ८० लाख रुपयांना मागणी येवूनही शेतकर्याने हा रेडा विकला नाही. मुरा जातीचा हा रेडा मंगसुळी (ता. कागवाड, जि. बेळगाव) येथील विलास नाईक यांचा आहे.
चार वर्षे वय असलेला हा रेडा सध्या शिवार कृषी प्रदर्शनाचे आकर्षण ठरला आहे. याबाबत शेतकरी नाईक यांनी सांगितले की, या रेड्याला खुराक म्हणून रोज किमान 15 लिटर दुध, भरडा तसेच अन्य खाद्य द्यावे लागते. या रेड्याला तब्बल ८० लाख रुपयांना मागणी आली होती. मात्र आपण तो विकणार नसल्याचे सांगितले. सध्या तासगावसह परिसरात या रेड्याला पहाण्यासाठी एकच गर्दी शिवार कृषी प्रदर्शनासाठी होवू लागली आहे.
हेही वाचलत का?