Mahadevrao Mahadik : 'बाजार समितीत विरोधाला विरोध म्हणून निवडणूक लावली' | पुढारी

Mahadevrao Mahadik : 'बाजार समितीत विरोधाला विरोध म्हणून निवडणूक लावली'

कोल्हापूर ; पुढारी ऑनलाईन : वडगांव शेती उत्पन्न बाजार समिती निवडणूकीसाठी २१ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. महाविकास आघाडी आणि सत्तधारी पॅनेल यांच्यात थेट लढत होणार आहे. महाडिक-कोरे-आवाडे-शेट्टी-हाळवणकर-यड्रावकर-मिणचेकर युतीच्या राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीचा मेळावा आज (ता.१९) शिरोली येथे पार पडला. यावेळी माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी आपल्या खुमासदार शैलीत मेळाव्यात भाषण केले. (Mahadevrao Mahadik)

महादेवराव महाडिक म्हणाले, बाजार समितीची एखादी जागा विरोधकांनी आमच्याकडे मागितली असती तर त्यांनाही सामावून दिली असती. पण इतक्या चांगल्या पद्धतीने बाजार समितीचा कारभार चालू असूनसुद्धा केवळ विरोधाला विरोध म्हणून ही निवडणूक विरोधकांनी लादली.

Mahadevrao Mahadik : मतदारच मतदानातून चूक लक्षात आणून देतील

आमच्या विरोधकांना सर्व मतदार मतदानातून त्यांची चूक लक्षात आणून देतील. बाजार समिती व्यतिरिक्तही इथून पुढच्या राजकारणात आमदार कोरे यांनी महाडिकांच्या सोबत वाटचाल करावी. आमचा अनुभव घ्यावा; महाडिक दिलेला शब्द कधी बदलणार नाही. असे महाडिक म्हणाले.

महादेवराव महाडिक यांचे भाषण सुरू होते यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांचे आगमन झाले. यावेळी महाडिक यांनी शेट्टींचे स्वागत करताना म्हणाले, राजू शेट्टी ज्या गटात असतात त्या गटाला शेतकऱ्यांचा मोठा पाठिंबा असतो.

विनय कोरे यांनी बाजार समितीच्या बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न केला. परंतु काहींना निवडणुक घ्यायची घाई लागली आहे. पण हा महाडिक दिलेले शब्द नेहमी पाळत असतो. विरोध करायचा म्हणून ही निवडणूक असल्याचेही ते म्हणाले.

महाविकास आघाडीकडून आमच्या युतीमध्ये खोडा

आमदार कोरे म्हणाले, विधायक कामासाठी झालेली ही एकजूट इथून पुढच्या काळातही टिकून राहील. महाविकास आघाडीकडून आमच्या या युतीमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला गेला, पण तो प्रयत्न असफल ठरला हे आजच्या उपस्थित मतदारांच्या संख्येवरून समजून येते.

शेतकरी विकासाचा केंद्रबिंदू व्हावा या हेतूने आपण एकत्र आलेलो आहोत आणि म्हणूनच शाहू शेतकरी विकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील.

आमदार प्रकाश आवाडे म्हणाले, ‘निवडणूक लादणाऱ्यांना हिसका दाखवायची ही वेळ आहे आणि उपस्थित मतदारांची संख्या पाहता विरोधकांचे डिपॉजिट जप्त होईल, यात कसलीही शंका आता उरलेली नाही.

आम्हाला कधीही तिथे आंदोलन करण्याची आम्हाला गरज पडली नाही

माजी खासदार शेट्टी म्हणाले, वडगांव बाजरी समिती अतिशय उत्तम पद्धतीने कारभार करत आहे. आजपर्यंत कधीही तिथे आंदोलन करण्याची आम्हाला गरज पडली नाही. शेतकऱ्यांच्या फायद्याची ही आघाडी आहे. म्हणू या आघाडीला पाठिंबा दिला.

माजी आमदार हाळवणकर यांनी, बाजार समितीमध्ये पुन्हा सत्ता आल्यास केंद्र सरकारच्या माध्यमातून दोन शीतगृह बांधून देऊ असा शब्द दिला.

माजी महादेवराव महाडिक, आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार सुरेश हाळवणकर, अमल महाडिक, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, अरुण इंगवले, अशोकराव माने, भगवानराव काटे उपस्थित होते.

राजाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन शिवाजीराव पाटील यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. वडगांव शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेश पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Back to top button