बारामती; पुढारी वृत्तसेवा : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहिल्याच्या कृतीमुळे राज्यातील शिवप्रेमी नाराज झाल्याचे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले. लोकशाहीत संविधानाने प्रत्येकाला काही अधिकार दिले आहेत. त्यामुळे कोणी काय करावे, काय करू नये, हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे यासंबंधी आंबेडकर यांनीच भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही पवार यांनी केली. बारामतीत पत्रकारांशी ते बोलत होते.
पवार म्हणाले, प्रकाश आंबेडकर हे सिनिअर आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरातील आहेत तसेच माजी खासदार आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते आहेत. एखाद्या व्यक्तीने त्यांच्या सदसदविवेक बुद्धीला स्मरून काय करावे, हा त्यांचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये संविधानाने तो त्यांना दिलेला आहे. परंतु कोणी अशी कृती केली तर ती शिवप्रेमींना आवडत नाही. इतिहासात औरंगजेबाने त्या पद्धतीने त्रास दिला, काही घटना घडल्या, त्यामुळे लोकांना ते योग्य वाटत नाही. परंतु उद्या तुम्ही पत्रकार म्बणून तेथे जावून पाहणी केली तर आम्ही विरोध करू शकत नाही. याबाबत जास्त अधिकारवाणीने आंबेडकर हेच सांगू शकतील की ते तेथे कशासाठी गेले होते, त्यांच्या मनामध्ये काय आहे, हे त्यांनी स्पष्ट केल्याशिवाय आम्हाला कळणार नाही. पण शनिवारी मी संभाजीनगर परिसरात होतो. तेथे या प्रकाराची दबक्या आवाजात कुजबूज सुरु होती, सोशल मिडियावर चर्चा होती. एक गोष्ट खरी आहे की या कृतीमुळे शिवप्रेमी नाराज झाले.
गत आठवड्यात वृत्तपत्रात आलेल्या जाहिरातीवरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. राज्यात जाहिरातबाजी सुरु आहे. तुम्ही पक्ष काढणार असेल आणि जाहिरातीसाठी तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्हीही जाहिरातबाजी करू शकता, असे पवार पत्रकारांना म्हणाले. मुख्यमंत्र्यांना राज्यापुरते न थांबता देशात पोहोचावे असे वाटते आहे, म्हणून त्यांचा प्रयत्न चालला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजवर अनेकांनी असे प्रयत्न केले. काहींना यात थोडे फार यश आले. काहींना अपयश आले. शेवटी जनता जनार्दनाच्या हाती सगळे असते, असे पवार म्हणाले.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.