Latest

आदित्य ठाकरेंनी व्यंकटेश्वरा मंदिरासाठी जमीन देण्याचे पत्र तिरुपती देवस्थानास सुपुर्द केले

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : नवी मुंबईतील उलवे नोड येथे व्यंकटेश्वराचे मंदिर उभारण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानास भाडेपट्ट्याने जमीन देण्याबाबतचे पत्र पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज  सकाळी देवस्थानचे अध्यक्ष वाय. व्ही. सुब्बा रेड्डी यांच्याकडे तिरुमला तिरुपती येथे जाऊन सुपूर्द केले. प्रारंभी त्यांनी पहाटे व्यंकटेश्वराचे दर्शन घेऊन पूजा केली. तसेच आपल्यासमवेतचे पत्र चरणी अर्पण केले.

आज पहाटे आदित्य ठाकरे यांचे तिरुपती येथे आगमन झाले. त्यांनी प्रारंभी पद्मावती दर्शन केले. यावेळी तिरुपती देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी धर्मा रेड्डी, देवस्थानाचे सदस्य मिलिंद नार्वेकर, युवा सेनेचे राहुल कनाल, सूरज चव्हाण व देवस्थानाचे इतर अधिकारीदेखील उपस्थित होते.

आदित्य ठाकरे : पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू

तिरुपती देवस्थानाने विनंती केल्यावर सिडको तसेच राज्य शासनाने अतिशय कमी कालावधीत याविषयीचा निर्णय घेऊन जमीन उपलब्ध करून दिली, त्यामुळे बालाजीच्या लाखो भाविकांची मोठी सोय होणार आहे.. जमीन वाटपाचे पत्र देण्यासाठी स्वतः मंत्री आदित्य ठाकरे तिरुपतीला आले याविषयीही त्यांनी समाधान व्यक्त करून आभार मानले. तिरुमला तिरुपती देवस्थानम बोर्डातर्फे देशात हैद्राबाद, चेन्नई, कन्याकुमारी, बंगलुरु, विशाखापट्टनम, भुवनेश्वर, जम्मू, नवी दिल्ली, कुरुक्षेत्र व ऋषिकेश या ठिकाणी शहर पातळीवरील सुविधा म्हणून भगवान श्री व्यंकटेश्वराचे मंदीर उभारणी करण्यात आली आहे. या धर्तीवर नवी मुंबईमध्ये मंदिर उभारण्यासाठी  तिरुपती देवस्थानाने जमीन उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती.

नवी मुंबईतील श्री व्यंकटेश्वराचे मंदीर भाविकांसाठी तसेच पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. त्यामुळे त्या परिसराला धार्मिक व सामाजिक महत्त्व प्राप्त होऊन स्थानिक परिसरात रोजगार संधी निर्माण होतील. या देवस्थानामार्फत या परिसरात अनेक समाज उपयोगी उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. सर्व बाबींचा विचार करुन एक विशेष बाब म्हणून हा भूखंड  उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT