Latest

उस्मानाबाद : जळालेला ऊस पाहून महिलेचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

अनुराधा कोरवी

कळंब: पुढारी वृत्तसेवा; तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी ऊस कारखान्याला वेळेवर जात नसल्याने हैराण झाले असून त्यातच महावितरणचा भोंगळ कारभार समोर येत आहे. याच दरम्यान उस्मानाबादमधील सौंदणा येथे जळालेला ऊस पाहून एका महिलेचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. या महिलेचे नाव अंजनाबाई माणिकराव पाचपिंडे (वय ६५) असे आहे.

याबाबतची माहिती अशी की, तालुक्यातील सौंदणा (अंबा) येथील दत्ता माणिकराव पाचपिंडे यांनी त्यांचे चुलते भगवान पाचपिंडे यांचे शेत वाट्याने केले होते. त्या शेतातील तीन एकर ऊस शुक्रवारी (दि. ८) रोजी शॉर्टसर्किटमुळे जळाला. सदरील उसाचा सर्व खर्च वाटेकऱ्याकडे असल्याने दत्ता पाचपिंडे यांचे खूपच नुकसान झाले. त्यातच चार दिवसांपासून कुठल्याही कारखान्याची तोड मिळत नसल्याने ऊस शेतातच उभा होता. यामुळे दत्ता पाचपिंडे यांच्या आई अंजनाबाई माणिकराव पाचपिंडे या तणावात होत्या. त्यांना रविवारी पहाटे हृदयविकाराचा झटका आला.

यानंतर अंजनाबाई यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथे नेले असता आज सोमवारी (दि. ११) रोजी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. एकीकडे वर्षभर पोटच्या मुलाप्रमाणे जोपासलेले पीक उद्ध्वस्त झाले तर डोक्यावरील मायेचे छत्र हरवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.  (जळालेला ऊस)

ऊस आणखीही उभाच

भगवान पाचपिंडे यांच्या नावे बिगरसभासद म्हणून नॅचरल शुगरला नोंद दिलेली आहे. परंतु, नॅचरल शुगरने उसाची प्रचंड उत्पादकता पहाता बिगर सभासदांचा ऊस गाळायचा नाही असे धोरण ठरवले आहे. तसेच येडेश्वरी शुगरचे दत्ता पाचपिंडे हे सभासद आहेत. परंतु, येडेश्वरी शुगरने मालकतोड करून ऊस गाळपासाठी आणावा यासाठी परवानगी दिली आहे. तर सध्या आई अंजनाबाईचा मृत्यू झाल्याने आम्ही ऊस कसा तोडायचा असे दत्ता पाचपिंडे यांनी 'दैनिक पुढारी'शी बोलताना सांगितले. यासाठी कुठल्याही कारखान्याने पुढे येऊन हा ऊस नेणे गरजेचे आहे, तरच हे कुटुंब जगू शकेल असे नागरिकांतून बोलले जात आहे.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT