Latest

फीच्या बदल्यात घेतली महिलेची मालमत्ता; कोल्हापुरातील वकिलाला १४ लाखांचा दंड, सनद झाली रद्द

मोहन कारंडे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : फीच्या बदल्यात पक्षकार महिलेची मालमत्ता लिहून घेणाऱ्या कोल्हापूर येथील वकील रणजितसिंह घाटगे याची वकिलीची सनद पाच वर्षांसाठी काढून घेण्याचा निर्णय भारतीय वकील परिषदेच्या शिस्तपालन समितीने घेतला आहे. तसेच तक्रारदार महिलेस १४ लाख रूपये देण्याचाही आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे रणजीतसिंह घाटगे वकील म्हणून पुढील पाच वर्षासाठी कोणत्याही न्यायालयात काम करू शकणार नाही.

संबंधित बातम्या : 

इचलकरंजी येथील एका महिला पक्षकाराने वकील रणजीत सिंह घाटगे याच्याविरुद्ध बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांचे शिस्तपालन समितीकडे, तिचे वकिलांनी कायदेशीर नीतिमत्ता पाळली नाही, या कारणासाठी वकील कायदा कलम ३५ नुसार तक्रार दाखल केली होती. तक्रारदार महिलेच्या पतीचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या सासरच्या लोकांनी त्या महिलेचा कुटुंबातील व मालमत्तेवरील हक्क नाकारला होता. महिलेने तिचा हक्क मिळवण्यासाठी रणजीत घाटगे याच्याशी संपर्क साधला. घाटगे याने वाटणीचा दावा करतो व तुम्हाला सर्व प्रॉपर्टी मिळवून देतो, यासाठी २ कोटी फी द्यावी लागेल असे सांगितले. संबंधित महिलेने घाटगे याला ११ लाख फी पोटी दिले. परंतु, बाकी रक्कम देणे शक्य नसल्याने उर्वरित रकमेसाठी मुदत मागितली असता घाटगे याने उर्वरित रकमेसाठी पक्षकार महीलेला मिळणाऱ्या प्रॉपर्टी मधील ३३ टक्के हिस्सा स्वतःचे नावे लिहून घेतला. तसा लेखी करार केला व प्रॉपर्टी मिळवून देण्याची हमी दिली. तथापि, दिलेल्या हमीप्रमाणे कोणतेही काम कोर्टात दाखल केले नाही व फी पोटी घेतलेली रक्कम देखील परत दिली नाही. त्यामुळे, प्रॉपर्टीत हिस्सा लिहून घेण्याचे कृती बेकायदेशीर व व्यावसायिक शिस्त अनुपालन भंग करणारी आहे, अशा स्वरूपाची तक्रार पक्षकार महिलेने दाखल केली होती.

तक्रार सुरुवातीस बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा'च्या शिस्तपालन समितीकडे आली असता शिस्तपालन समितीचे सदस्य अॅड. आशिष पंजाबराव देशमुख यांनी घाटगे याला दोषी मानून सदरची तक्रार ३ सदस्य शिस्तपालन समितीकडे देण्याचा आदेश दिला. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सदरची तक्रार भारतीय विधीज्ञ परिषदेच्या शिस्तपालन समिती समोर पाठवण्यात आली. समितीने चौकशी नुकतीच पूर्ण केली. चौकशीवेळी तक्रारदार महिलेकडून इचलकरंजी येथील अॅड. अमित सिंग यांनी काम चालवले तसेच रणजीत घाटगे याने स्वतः काम चालवले, या कामी वकिलाला पक्षकाराकडून फी व्यतिरिक्त इतर कोणत्याही मार्गाने कोणतीही मालमत्ता मागता येणार नाही, वकिलाने फी घेतल्यानंतर काम दाखल करणे व प्रामाणिकपणे चालवणे वकिलाची जबाबदारी आहे. घाटगे याचे हे गैरवर्तन असल्याचे स्पष्ट करत शिस्तपालन समितीने घाटगे यांना दोषी ठरवले.

घाटगे याने मात्र ११ लाख रूपये मिळाले नाहीत असा बचाव घेतला होता. तक्रारदार महिलेने बँक अकाऊंट स्टेटमेंट सादर करून दावा चुकीचा ठरवला. तसेच घाटगे याने बेकायदेशीरपणे लिहून घेतलेला ३३ टक्के हिस्सा मागणीचा करारच शिस्तपालन समितीसमोर हजर केला. तक्रारदार महिलेस दोन लहान मुले असून त्यांचाही हिस्सा लिहून घेण्यात आला आहे, असे त्या महिलेचे म्हणणे होते. तसेच घाटगे याने वकील कायदा कलम ३५ नुसार व्यावसायिक गैरवर्तन केले, असे म्हणणे होते. अखेर घाटगे याला दोषी ठरवण्यात आले व त्याची सनद पाच वर्षासाठी रद्द करण्यात आली आहे. तसेच तक्रारदार महिलेस ६ टक्के व्याजाने १४ लाख रूपये परत देण्याचाही आदेश देण्यात आला आहे. १४ लाख व्याजासह परत न केलेस घाटगे याची सनद कायमची रद्द करण्यात येईल, असेही निर्देश दिले आहेत.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT