पत्नीने पतीला कार्यालयात जाऊन भेटणे, सहकाऱ्यांसमोर शिवीगाळ करणे म्हणजे क्रूरताः छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निर्णय

पत्नीने पतीला कार्यालयात जाऊन भेटणे, सहकाऱ्यांसमोर शिवीगाळ करणे म्हणजे क्रूरताः छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निर्णय

पुढारी ऑनलाईन: पत्नीने वारंवार पतीच्या कार्यालयात जाऊन शिवीगाळ करणे, त्याचा अपमान करणे आणि पतीच्या सहकाऱ्यांसमोर एक सीन (देखावा) तयार करणे हे पतीला घटस्फोट घेण्यास पात्र ठरणारी क्रूरता आहे, असे छत्तीसगड हायकोर्टाने नलिनी मिश्रा विरुद्ध सुरेंद्र पटेल या खटल्याची सुनावणी करताना म्हटले आहे. शिवाय या प्रकरणात पत्नीने केलेल्या अनैतिक संबंधांच्या आरोपांबाबत न्यायालयाने सांगितले की, अशा आरोपांना पुष्टी देण्यासाठी पत्नीच्या तोंडी विधानाशिवाय कोणताही पुरावा नाही.

न्यायमूर्ती गौतम भादुरी आणि न्यायमूर्ती राधाकिशन अग्रवाल यांच्या खंडपीठासमोर पत्नीच्या क्रूरतेच्या कारणावरून घटस्फोट देण्याच्या कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या महिलेने दाखल केलेल्या अपीलावर सुनावणी सुरू होती. "पत्नी नवर्‍याच्या कार्यालयात जाऊन शिवीगाळ करत सीन (देखावा) तयार करत असे, असे प्रस्थापित झाले आहे. अशा स्थितीत जेव्हा पत्नी पतीच्या कार्यालयात जाते, त्याला शिवीगाळ करते आणि त्याच्यावर काही नात्याचा आरोप करते. स्वाभाविकच तेव्हा सहकाऱ्यांसमोर पतीची प्रतिमा मलिन होऊन कार्यालयातील त्याची प्रतिष्ठा देखील कमी होईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.

आपल्या पतीचे एका महिला सहकाऱ्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप करणारी पत्नीने मुख्यमंत्र्यांकडे केलेली तक्रार ही क्रूरता आहे, असे निरीक्षणही खंडपीठाने नोंदवले. "कोणत्याही पुराव्याशिवाय महिला सहकाऱ्याशी अनैतिक संबंध असल्याच्या कारणास्तव पतीची बदली करावी, अशी मंत्र्याकडे तक्रार करणे ही क्रूरता आहे," असे या निकालात देखील म्हटले आहे. तसेच न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला, जिथे पतीला घटस्फोट मंजूर केला होता.

दरम्यान या जोडप्याचे 2010 साली लग्न झाले होते आणि त्यांनी एका मुलालाही जन्म दिला आहे. प्रतिवादी पतीने असा आरोप केला होता की, पत्नी स्वतःच्या आवडीनुसार पैसे खर्च करते आणि माझ्या पालकांना भेटायला जाण्यावर आक्षेप घेते.

पतीने पुढे आरोप केला आहे की, पत्नी त्याचा संपूर्ण पगार काढून घेते आणि तोच आपल्या व्यवसायात खर्च करते. खर्चाबाबत काही विचारणा केली असता, त्याला शिवीगाळ करण्यात आली. पतीच्या संमतीशिवाय पत्नीने कर्जावर 5 वाहने घेतली आणि मुलाच्या संगोपनासह घरातील जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी ती जाणीवपूर्वक टाळाटाळ करते, असा आरोपही करण्यात आला. नंतर पतीवर इतर महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोपही तिने सुरू केला. त्यानंतर पतीने क्रूरतेचे कारण देत घटस्फोटासाठी अर्ज केला. कौटुंबिक न्यायालयाने तथ्ये आणि पुरावे तपासल्यानंतर याचिका मंजूर करत पतीला घटस्फोट दिला. विशेष म्हणजे पत्नीच्या एका बहिणीने तिच्याविरोधात आणि बहिणीच्या पतीच्या बाजूने कोर्टात साक्ष दिली.

या आदेशाविरोधात पत्नीने सध्याचे अपील दाखल केले होते. पत्नीच्या वकिलाने असे म्हटले की, कौटुंबिक न्यायालयाने पत्नीला तिच्या पतीने क्रूरपणे वागणूक दिली आहे. पतीने तिच्यावर क्रूरता दाखवली आणि घटस्फोट घेण्यासाठी खोटे पुरावे तयार करण्याचा प्रयत्न केला, असा दावा करण्यात आला. पुढे असे सादर करण्यात आले की, पत्नीला मुलासह पतीसोबत राहायचे होते परंतु कोणत्या ना कोणत्या कारणाने पती पत्नीसोबत राहू इच्छित नाही. पत्नी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असून पत्नीला पतीच्या पैशात रस असल्याचा पतीचा आरोप खोटा असल्याचे त्यांनी पुढे नमूद केले.

कौटुंबिक न्यायालयाने केवळ तिच्या खर्‍या बहिणीच्या साक्षीच्या आधारे चुकीचा निकाल दिला, असा दावाही करण्यात आला. पत्नीचे म्हणणे आणि पतीची उलटतपासणी यातून क्रौर्याचे कारण समोर येत नाही आणि केवळ एका सख्ख्या बहिणीने पत्नीच्या विरोधात कौटुंबिक न्यायालयात साक्ष दिल्यामुळे क्रूरतेची वस्तुस्थिती ग्राह्य धरण्यात कौटुंबिक न्यायालय चुकले, असा युक्तिवाद पत्नीच्या वतीने केला. दुसरीकडे, पतीच्या वकिलाने असा युक्तिवाद केला की, पत्नीने केवळ विवाहबाह्य संबंधांचा आरोप करून फक्त पतीचे चारित्र्यहनन केले नाही तर त्याच्या कार्यालयात जाऊन सहकाऱ्यांसमोर सीन तयार केला.

पतीसोबत एका महिलेचे संबंध असल्याचा आरोप करत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून त्यांच्या बदलीची मागणी केली होती. क्षुल्लक मुद्द्यावरून पत्नी पतीला शिवीगाळ करत असे पुराव्यातुन दिसून आल्याचे खंडपीठाने नमूद केले. न्यायालयाने पत्नीच्या वागणुकीची काही उदाहरणेही अधोरेखित केली. एक म्हणजे पत्नीने आपल्या पतीच्या बदलीसाठी मुख्यमंत्र्यांना पाठवलेले पत्र. "जेव्हा पत्नीला या पत्राबद्दल विचारले तेव्हा तिने त्यावर स्वाक्षरी केली नसल्याचे सांगितले. डिपॉझिशन मेमो आणि शपथपत्रात पत्नीची स्वाक्षरी जोडली जाते. जेव्हा पी-4 च्या स्वाक्षरीची प्रतिज्ञापत्रावरील स्वाक्षरीशी तुलना केली तेव्हा प्रथमदर्शनी डिपॉझिशन शीट मेमो आणि प्रतिज्ञापत्रावरील स्वाक्षरी एकाच व्यक्ती आहे असे आढळले. म्हणून, स्वाक्षरीची तुलना करून पुरावा कायद्याच्या कलम 73 अन्वये अधिकार वापरताना, आम्ही असे मानतो की यात कोणतीही संदिग्धता किंवा थोडासा संशय नाही की, पी. -4 वर पत्नी नलिनी यांनी स्वाक्षरी केली होती," असे न्यायालयाने सांगितले.

पत्नीने केलेल्या अनैतिक संबंधांच्या आरोपांबाबत न्यायालयाने सांगितले की, अशा आरोपांना पुष्टी देण्यासाठी पत्नीच्या तोंडी विधानाशिवाय कोणताही पुरावा नाही. महत्त्वाचे म्हणजे, पत्नीच्या बहिणीनेच तिच्याविरुद्ध साक्ष दिली होती, असे न्यायालयाने नमूद केले. "तिच्या स्टेटमेंटमध्ये तिने असे स्पष्ट केले की नलिनी, तिची बहीण ही एक रागीट आणि भांडण करणारी महिला आहे. ओडिशा येथे दोन वर्षे त्याच्यासोबत राहिल्यानंतर तिने तिच्या पूर्वीच्या पतीसोबत वेगळे राहण्यास सुरुवात केली, ज्यामध्ये पहिला पती परेश विश्वकर्मा अनेक संकटात सापडला आणि त्याला आजारपणाने ग्रासले. आणि अखेर त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर तिची बहीण मुलासह रायपूरला आली आणि त्यांच्याकडेच राहात होती. त्यानंतर तिने मुलांना बहिणीच्या आणि तिच्या आईच्या ताब्यात ठेवून चांगोराभाठा या ठिकाणी उमेशसोबत राहायला सुरुवात केली. त्यानंतर कुटुंबाने हस्तक्षेप केला आणि ती पुन्हा आली. नंतर कंत्राटदाराचे काम सुरू केले," असे न्यायालयाने नमूद केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news