Latest

Congress leader Pawan Khera: काँग्रेस नेते पवन खेरा यांना अटक, विमानातून उतरवले

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : छत्तीसगडमधील रायपूरला जायला निघालेल्या काॅंग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांना दिल्ली विमानतळावरील विमानातून उतरवून अटक करण्यात आली आहे. दरम्यान ज्या विमानातून खेरा यांना उतरविण्यात आले, त्या विमानाजवळच काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले. पवन खेरा यांच्याविरोधात आसाममधील दिमा हासाओ जिल्ह्यातील हाफलांग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. आसाम पोलिसांच्या शिफारशीवरुन दिल्ली पोलिसांनी त्यांना विमानातून उतरवून ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील पवन खेरा यांचा रिमांड घेण्यासाठी आसाम पोलिसांचे एक पथक दिल्लीला रवाना झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

काही दिवसांपूर्वी पवन खेरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडिलांवर वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर त्यांच्यावर लखनऊमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्यावरील कारवाईला आत्ताच्या प्रकरणाशी जोडले जात आहे. यानंतर आसाम पोलिसांनी खेरा यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. त्यानंतर आसाम पोलिसांच्या सांगण्यावरून दिल्ली पोलिसांना पवन खेरा यांना ताब्यात घेण्यात आले आहे. दिल्लीतील स्थानिक न्यायालयाची परवानगी घेण्यात आल्यानंतर त्यांना आसामला नेण्यात येईल, असे आसामचे पोलिस महानिरीक्षक प्रशांतकुमार भुईया यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

दरम्यान रायपूर येथे होत असलेल्या पक्षाच्या महाअधिवेशनात बाधा आणण्याचा प्रयत्न सत्ताधिकाऱ्यांकडून केला जात असल्याचा आरोप काॅंग्रेसने केला आहे. 'हुकुमशहाने अधिवेशनाच्या आधी ईडीमार्फत छापे टाकले आणि अशा प्रकारचे कृत्य केले जात आहे', अशी टिप्पणीही काॅंग्रेसने केली आहे. दिल्ली विमानतळावर घडलेल्या या नाट्यमय घडामोडीनंतर इंडिगो कंपनीने रायपूरसाठीचे संबंधित विमानाचे उड्डाण रद्द केले. आणि अन्य प्रवाशांना दुसऱ्या विमानाने रायपूरला पाठविण्यात आले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वादग्रस्त टिप्पणी केल्यानंतर पवन खेरा हे अलिकडे चर्चेत आले होते. खेरा यांच्याविरोधात भाजपने तक्रारही दाखल केलेली आहे.

पंतप्रधानांविरोधात वापरली होती आक्षेपार्ह भाषा….

अदानीच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेताना पवन खेरा यांनी पंतप्रधानांविरोधात  वादग्रस्त भाषा वापरली होती. जर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी जेपीसीची स्थापना करु शकतात, तर मग नरेंद्र 'गौतम दास' मोदी यांना काय समस्या आहे, असे खेरा म्हणाले होते. पत्रकारांनी त्यावेळी तुम्ही पंतप्रधानांच्या वडिलांचे चुकीचे नाव घेत आहात, असे सांगितले असता पंतप्रधानांच्या वडिलांचे नाव जरी 'दामोदर दास' असे असले तरी त्यांचे काम 'गौतम दास' सारखे आहे, असा टोमणा मारला होता.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT