पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील 15 जिल्ह्यातील 42 तालुक्यांमध्ये दुष्काळाची तीव्रता तपासण्याचे काम शासनाने हाती घेतले आहे. या विषयावर राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीची महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवारी (दि.20) सकाळी साडेअकरा वाजता व्हिडिओ कॉन्फन्सींगद्वारे होत आहे. राज्य सरकारला सादर करावयाच्या अहवाल अंतिम करण्यासाठी ही बैठक आहे.
खरीप हंगाम 2023 मध्ये सर्वाधिक 21 दिवसांपेक्षा अधिक पावसाचा खंड पडणे (ट्रिगर 1) आणि दुष्काळ (द्वितीय कळ -ट्रिगर 2) लागू झालेली आहे. अशा तालुक्यांची यादी संबंधित जिल्ह्यांना पाठविण्यात आलेली आहे. या तालुक्यांमधील 10 टक्के गावांची तपासणी, चाचणी करुन (रॅण्डम पध्दतीने) दुष्काळी स्थितीची प्रत्यक्ष स्थिती पाहून माहिती पूर्ण करण्याबाबतच्या सूचनाही कृषी आयुक्तालयाने दिलेल्या आहेत. केवळ दुष्काळामुळे (अतिवृष्टी, पूर किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे वगळून) शेती पिकांचे नुकसान झाले आहे काय, याची क्षेत्रीय सर्वेक्षण करणे आवश्यक आहे. त्यासाठी महा-मदत या मोबाईल अॅपचा वापर करण्यात येत आहे.
त्यातून सर्वेक्षण पूर्ण करुन या तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे किंवा कसे, असल्यास दुष्काळ मध्यम किंवा गंभीर स्वरुपाचा आहे, या बाबतचा उल्लेख करुन जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीस अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यावर ऑनलाईन बैठकीत चर्चा होऊन अहवाल अंतिम करुन तो शासनास पाठविला जाईल. दुष्काळ जाहीर करण्याची कार्यवाही राज्य सरकारकडून होईल. दुष्काळ घोषित केल्यानंतर केंद्र सरकारलाही ती माहिती पाठविण्यात येते, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
दुष्काळाचे मूल्यांकनातील जिल्हे आणि त्यापुढे तालुक्यांची नांवे नमूद केली आहेत.
धुळे ः शिंदखेडा. नंदुरबार ः नंदुरबार. नाशिक ः मालेगाव, सिन्नर, येवला. जळगाव ः चाळीसगाव. पुणे ः बारामती, दौंड, इंदापूर, मुळशी-पौड, पुरंदर-सासवड, शिरूर-घोडनदी, वेल्हा. सोलापूर ः बाशी, करमाळा, माढा, माळशिरस, सांगोला. सातारा ः खंडाळा, वाई. सांगली ः कडेगाव, खानापूर-विटा, मीरज, शिराळा. कोल्हापूर ः हातकणंगले, गडहिंग्लज. छत्रपती संभाजीनगर ः छ. संभाजीनगर, सोयगाव. जालना ः अंबड, बदनापूर, भोकरदन, जालना, मंठा. बीड ः आंबेजोगाई, धारुर, वडवणी. लातूर ः रेणापूर, धाराशिव- लोहारा, धाराशिव, वाशी. बुलडाणा ः बुलडाणा, लोणार.
हेही वाचा