Mars : मंगळावर नोंदवला गेला भूकंपाचा मोठा धक्का! | पुढारी

Mars : मंगळावर नोंदवला गेला भूकंपाचा मोठा धक्का!

लंडन : केवळ पृथ्वीवरच भूकंप होतात, असे नाही. मंगळासारखे अन्य ग्रह आणि चंद्रावरही भूकंप होत असतात. 4 मे 2022 या दिवशी मंगळावर इनसाईट लँडरने मोठ्या भूकंपाची नोंद केली होती. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.7 होती. पृथ्वीवर टेक्टोनिक प्लेटस्च्या हालचालींमुळे भूकंप होत असतात; मात्र मंगळाच्या भूगर्भात अशा टेक्टोनिक प्लेटस् नाहीत, असे मानले जात होते. त्यामुळे हा भूकंप कशामुळे निर्माण झाला असावा, याबाबत संशोधकांना कुतूहल होते. तो एखाद्या उल्केच्या कोसळल्याने झाला असावा, असेही त्यांना वाटते.

एखादा लघुग्रह किंवा उल्का कोसळल्यावर जमिनीवर खड्डा पडत असतो. त्याला ‘इम्पॅक्ट क्रेटर’ असे म्हटले जाते. वैज्ञानिकांनी मंगळावरील भूकंपानंतर असा एखादा खड्डा तिथे निर्माण झाला आहे का हे पाहिले. मात्र, त्यांना तसा कोणताही खड्डा आढळून आला नाही. त्यामुळे वैज्ञानिकांनी आता असा निष्कर्ष काढला आहे की, हा भूकंप मंगळावरील टेक्टोनिक प्लेटस्च्या हालचालींमुळेच झाला आहे. ग्रहाच्या अंतर्गत भागातील गडगडाट आणि जमिनीचे हादरणे कशामुळे घडते हे त्यांना यामधून समजले आहे.

याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘जियोफिजिकल रिसर्च लेटर्स’ या वैज्ञानिक नियतकालिकात देण्यात आली आहे. इंग्लंडच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतील संशोधक बेन फर्नांडो यांनी सांगितले की, हा भूकंप लघुग्रह किंवा एखाद्या मोठ्या उल्केच्या धडकेमुळे निर्माण झाला नसून, तो टेक्टोनिक हालचालींमुळेच झाल्याचा निष्कर्ष आम्ही काढला आहे. मंगळावरही इतका मोठा भूकंप येऊ शकतो हे आम्हाला यानिमित्ताने समजले. इम्पिरियल कॉलेज लंडनमधील संशोधक कॉन्स्टेंटिनो चारलाम्बस यांनी सांगितले की, या संशोधनामुळे मंगळाच्या अंतर्गत रचनेविषयी जाणून घेण्यास अधिक मदत होईल.

Back to top button