शाळेने चक्क ‘रोबो’लाच बनवले मुख्याध्यापक! | पुढारी

शाळेने चक्क ‘रोबो’लाच बनवले मुख्याध्यापक!

लंडनः सध्या सर्वत्र रोबो आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा बोलबाला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ‘एआय’ किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता ही सर्वात ‘ट्रान्सफॉर्मेटिव्ह’ आणि अद्ययावत असे तंत्रज्ञान आहे. माणसाच्या विचार प्रक्रियेची नक्कल करणारी ‘स्मार्ट’ यंत्रे या तंत्राने बनवली जात आहेत. अनेक क्षेत्रांमध्ये सध्या ‘एआय’चा वापर केला जात आहे. आता बि—टनमधील एका शाळेत एका ‘एआय’ रोबोलाच मुख्याध्यापक बनवण्यात आले आहे.

वेस्ट ससेक्समधील कॉट्समोर स्कूलने शाळेच्या मुख्याध्यापकांच्या मदतीसाठी एआय रोबो ‘अबीगॅल बेली’चे डिझाईन केले. त्यासाठी एका एआय डेव्हलपरची मदत घेण्यात आली. हे तंत्रज्ञान बर्‍याच अंशी चॅटजीपीटी, ऑनलाईन एआय सर्व्हिससारखे काम करते जिथे यूजर्स प्रश्न ‘इनपूट’ करतात आणि चॅटबॉटच्या अल्गोरिदमच्या द्वारे बनवण्यात आलेली उत्तरे मिळवतात.

शिक्षणावर ‘एआय’चा मोठाच प्रभाव पडत आहे. हा प्रभाव दूरगामीही आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची शिकण्याची आणि शिक्षकांची अध्यापनाची पद्धतही बदलत चालली आहे. या शाळेतील हा एआय रोबोही एखाद्या खर्‍या मुख्याध्यापकासारखेच काम करतो. अध्यापनापासून ते शाळेच्या प्रशासनापर्यंतच्या अनेक गोष्टींचा ऊहापोह या रोबोच्या माध्यमातून केला जातो.

Back to top button