

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : वैशिष्ट्यपूर्ण मंदिर स्थापत्य आणि खगोलशास्त्राचा उत्कृष्ट नमूना असणाऱ्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील किरणोत्सवास शुक्रवारी प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी सायंकाळी ६ वाजून १२ मिनिटांनी सुवर्ण किरणांनी देवीच्या मूर्तीचा चरण स्पर्श केला. एरव्ही तीन दिवस चालणारा हा किरणोत्सव यंदा सात दिवस पाहण्याची संधी भाविक- पर्यटकांना मिळणार आहे.
शुक्रवारी सायंकाळी ५ वाजून २५ मिनिटांनी मावळतीची सूर्य किरणे महाद्वारातून मंदिरात आली. यावेळी किरणांची तीव्रता ३ लाख ५० हजार लक्स इतकी होती. गरुड मंडपापर्यंत ५ वाजून २७ मिनिटांनी ३ लाख लक्स तीव्रतेची किरणे होती. पितळी उंबऱ्यापर्यंत ५.४८ वाजता किरणे पोहचली. इतकी होती. ६ वाजून १८ मिनिटांनी देवीच्या गुडघ्यापर्यंत किरणे पोहोचली.
खगोल अभ्यासक डॉ. मिलिंद कारंजकर यांच्या सुचनेनुसार ३ दिवसीय चालणाऱ्या किरणोत्सवाची चाचणी नियोजित तारखांच्या मागे-पुढे असे एकूण ७ दिवस घेण्याचा निर्णय देवस्थान समितीतर्फे घेण्यात आला. त्यानुसार पहिल्याच दिवशी किरणे देवीच्या पायापर्यंत पोहोचली आहेत.
देवस्थान समितीने डॉ. मिलिंद कारंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या किरणोत्सव मार्गाच्या पाहणीनुसार महापालिका प्रशासनाने अडथळे दूर केल्यास अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव पूर्ण क्षमतेने पाहण्याची संधी भाविकांना उपलब्ध होईल, असे देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले.
हे वचलंत का?