कोल्हापूर : सूर्यकिरणे देवीच्या चेहऱ्यापर्यंत; अंबाबाई मंदिरात तिसऱ्या दिवशी संपूर्ण किरणोत्सव (पाहा व्हिडिओ) | पुढारी

कोल्हापूर : सूर्यकिरणे देवीच्या चेहऱ्यापर्यंत; अंबाबाई मंदिरात तिसऱ्या दिवशी संपूर्ण किरणोत्सव (पाहा व्हिडिओ)

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : स्वच्छ, निरभ्र वातावरणामुळे शुक्रवारी मावळतीची सोनेरी सूर्यकिरणे अंबाबाई मूर्तीच्या चेहऱ्यापर्यंत पोहोचली. सायंकाळी ५ वाजून ४४ मिनिटांनी किरणांनी देवीचा चरनस्पर्श केला. त्यानंतर अवघ्या चार मिनिटांनी म्हणजेच ५ वाजून ४८ मिनिटांनी किरणे चेहऱ्यापर्यंत पोहोचली. त्यामुळे दक्षिणायन कालखंडातील किरणोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी संपूर्ण किरणोत्सव पाहण्याची संधी भाविक- पर्यटकांना मिळाली.

देवीचा वार शुक्रवार असल्याने प्राचीन भारतीय मंदिर स्थापत्यकलेचे वैशिष्ट्य असणाऱ्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यामुळे देवस्थान समितीच्या वतीने मंदिर परिसरात भव्य स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती. स्क्रीनसमोर बसून भाविकांनी किरणोत्सवाचा आविष्कार पाहिला. शुक्रवारी सायंकाळी सूर्याची मावळतीची किरणे पश्चिमेकडील महाद्वारातून मंदिराच्या दिशेने आली. गरुड मंडप, गणपती मंदिर, गणपती चौक, कासव चौक, पितळी उंबरा, खजिना चौक, चांदीचा उंबरा असा प्रवास करून सूर्यकिरणे सायंकाळी ५ वाजून ४४ मिनिटांनी देवीच्या चरणांपर्यंत पोहोचली. ५ वाजून ४५ मिनिटांनी गुटघ्यापर्यंत, ५ वाजून ४६ मिनिटांनी कंबरेपर्यंत, ५ वाजून ४७ मिनिटांनी खांद्यापर्यंत आणि ५ वाजून ४८ मिनिटांनी चेहऱ्यापर्यंत किरणांचा प्रवास होता.

किरणोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सूर्यकिरणे देवीच्या चेहऱ्यापर्यंत पोहोचल्याने किरणोत्सव पूर्ण झाला. यानंतर शनिवारी किरणांचा परतीचा प्रवास सुरू होईल. रविवारी पुन्हा चरणस्पर्शाने किरणोत्सवाची सांगता होणार आहे. दरम्यान, शुक्रवारी किरणांची दिशा पाहण्यासाठी मॅग्नेटोमीटरचा वापर करण्यात आला होता. विमान व जहाजात अचूक दिशादर्शनासाठी याचा वापर केला जातो.
-डॉ. मिलिंद कारंजकर, खगोलशास्त्र व पदार्थविज्ञान विभागप्रमुख, विवेकानंद महाविद्यालय

Back to top button