राज्यातील स्वायत्त महाविद्यालयांना 451 पदांचे वाटप

राज्यातील स्वायत्त महाविद्यालयांना 451 पदांचे वाटप
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील 2 हजार 88 पदांच्या सहायक प्राध्यापकभरतीसाठी 94 महाविद्यालयांनी 'ना हरकत' प्रमाणपत्र मागणी प्रस्ताव सादर केलेले नाहीत. त्यामुळे संबंधित महाविद्यालयांतील सहायक प्राध्यापक संवर्गातील उर्वरित 451 पदांचे 66 अनुदानित स्वायत्त महाविद्यालयांना समप्रमाणात वाटप करण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे. शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून राज्यातील स्वायत्त महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 लागू करण्यात आले आहे. या धोरणामुळे अभ्यासक्रमात रचनात्मक बदल होत असल्याने अभ्यासक्रम आणि मूल्यमापन प्रक्रियेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कौशल्यपूर्ण प्राध्यापकांची गरज आहे.

सहायक प्राध्यापक संवर्गातील 2 हजार 88 पदांच्या भरतीस मान्यता देण्यात आली आहे. त्यानुषंगाने 'ना हरकत' प्रमाणपत्रासाठी मागणीपत्र सादर करण्याच्या सूचना संबंधित महाविद्यालयांना देण्यात आल्या होत्या. मात्र, दिलेल्या कालमर्यादेत महाविद्यालयांनी प्रस्ताव सादर केले नाहीत. प्रस्ताव सादर करण्यासाठी आणखी एक संधी देऊनही महाविद्यालयांनी प्रस्ताव सादर केले नाहीत.

महाविद्यालयांनी प्रस्ताव सादर न करण्यामागे संस्थेची अनुसूची अद्ययावत नसणे, व्यवस्थापनात अंतर्गत वाद, संस्था-महाविद्यालयांतील न्यायालयीन प्रकरण, बिंदुनामावली प्रमाणित असणे, अशी कारणे असल्याचा अहवाल उच्च शिक्षण संचालनालयाने सादर केला. त्यामुळे संबंधित महाविद्यालयांना या पदांची आवश्यकता नाही, असे गृहीत धरून त्या महाविद्यालयांची पदे अनुदानित स्वायत्त महाविद्यालयांना देण्याचा निर्णय घेण्यात आला.

अतिरिक्त ठरलेल्या सहायक प्राध्यापकांचे रिक्त जागेवर समायोजन करावे. संबंधित विषयासाठी सहायक प्राध्यापकपद अतिरिक्त नसल्याचे सहसंचालकांनी प्रमाणित केल्यावरच पदभरतीची जाहिरात देता येईल. संबंधित पदांना आरक्षण लागू राहील. अनुदानित महाविद्यालयांतील शिक्षक, शिक्षकेतर पदांचा आकृतिबंध अद्याप निश्चित झालेला नाही.

त्यामुळे 2017 च्या विद्यार्थिसंख्येनुसार लागू होणारी रिक्त पदे आधारभूत मानण्यात आली आहेत. आकृतिबंध अंतिम झालेला नसल्याने आकृतिबंधास वित्त विभागाची अंतिम मान्यता मिळेपर्यंत ही पदे अंतिम समजण्यात येऊ नयेत. पदभरती करताना विद्यापीठ अधिनियमातील तरतुदींचे काटेकोर पालन करून प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच नियुक्ती आदेश देण्याबाबत स्पष्ट केले आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news