

अकोला, पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील शिवसेना उपशहर प्रमुखाची गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर मृतदेह कापशी तलावात फेकून देण्यात आला होता. भागवत अजाबराव देशमुख (वय २८, रा. कौलखेड) असे हत्या करण्यात आलेल्या युवा कार्यकर्त्याचे नाव असून पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात मारेक-यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भागवतचा मृतदेह तलावाच्या पाण्यात राहिल्याने त्याची ओळख पटू शकली नाही, त्यामुळे पोलिसांकडून त्याच्यावर अंत्यविधी करण्यात आला होता.
२७ ऑगस्टला पातुर पोलीस स्टेशन हद्दीतील कापशीच्या तलावात अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला, त्याचा मृतदेह वैद्यकीय चाचणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. मात्र, वैद्यकीय तपासणीच्या अहवालात या युवकाची हत्या झाल्याचे समोर आले. कापशी तलावाच्या पाण्यात दोन दिवसापासून मृतदेह पडून असल्याने युवकाची ओळख पटवणे कठीण झाले होते, त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर २९ ऑगस्ट रोजी अंत्यसंस्कार केले.
दरम्यान, ३० ऑगस्ट रोजी पुन्हा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तलावाच्या परिसरातील पाहणी केली असता अर्धा किलोमीटरवर एका रुमालामध्ये आधार कार्ड आणि इतर काही वस्तू आढळून आल्या. या संदर्भात पोलिसांनी अधिक चौकशी केली असता तो युवक बेपत्ता असल्याची तक्रार अकोल्यातीलच खदान पोलीस स्टेशन इथे दाखल होती. त्यामुळे भागवत देशमुख या युवकाची ओळख पटली.
भागवत देशमुख गेल्या २५ ऑगस्ट पासून बेपत्ता होता, त्याचा अनेक ठिकाणी शोध घेण्यात आला, मात्र अखेरीस नातेवाईकांनी भागवत बेपत्ता असल्याची तक्रार खदान पोलीस ठाण्यात दाखल केली. दरम्यान, ३१ ऑगस्ट रोजी नातेवाईकांना या संदर्भात पोलिसांनी माहिती दिली की भागवत याची हत्या झाली असून तेव्हा कुठलीही ओळख न पटल्याने पोलिसांकडून त्याच्यावर अंत्यविधी करण्यात आला. पातुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भागवत देशमुख याची अज्ञात व्यक्तींनी आधी गळा आवळून हत्या केली, त्यानंतर त्याचा मृतदेह तलावात फेकून दिला, असे वैद्यकीय अहवालात समोर आले आहे.