

पुढारी ऑनलाईन: Air India flight : एअर इंडियाच्या लंडन-मुंबई फ्लाइटमध्ये बाथरूममध्ये धुम्रपान करणे आणि इतर प्रवाशांशी गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना11 मार्च रोजी चालू फ्लाइटमध्ये घडली. 37 वर्षीय व्यक्तीने इतर प्रवाशांशी गैरवर्तन आणि धुम्रपान करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी एका अमेरिकन नागरिकाविरुद्ध सहार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कारवाईत अडथळा आणल्याप्रकरणी मुंबईतील सहार पोलिसांनी रमाकांत (37) याला ताब्यात घेतले असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
Air India flight : फ्लाइट क्रूच्या म्हणण्यानुसार, या आरोपीने लंडन-मुंबईच्या फ्लाइटचा उड्डाणादरम्यान दरवाजा उघडण्याचा देखील प्रयत्न केला आहे. त्यानंतर त्याने त्याच्या बॅगेत काही औषधे असल्याचेही सांगितले. परंतु त्यांची बॅग तपासली असता बॅगेत अशी कोणतीही वस्तू आढळली नाही. त्यामुळे तो मद्यधुंद अवस्थेत होता? की, मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता? याची खात्री करण्यासाठी आरोपीचे काही नमुने तपासणीसाठी पाठवले असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.