

पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटरच्या माध्यमातून धमकी देण्यात आली आहे. यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. सध्या अनेकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 'पवारांना धमकी देणारा सौरभ पिंपळकर हा भाजपचा कार्यकर्ता आहे अशी त्याची फेसबुकवर माहिती आहे. त्याला भाजपचा पाठिंबा आहे का? याचाही तपास करावा. चूक करणाऱ्याला अटक करत कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
अजित पवार म्हणाले, मी याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी फोनवरुन संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण दोघेही बाहेर असल्याने संपर्क झाला नाही. विचारांची लढाई विचारांनी करू. प्रत्येकाला आपले विचार आणि मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे. संविधानाने सर्वांना अधिकार दिला आहे. त्याचा गैरवापर कशाला करायचा.
ते पुढे म्हणाले, सौरभ पिंपळकर नावाच्या ट्वीटर अकाउंटवर धमकी देण्यात आली आहे. त्यांच्या ट्वीटरच्या बायोमध्ये भाजपाचा कार्यकर्ता असा उल्लेख आहे. पण, तो खरंच भाजपाचा कार्यकर्ता आहे का? याची माहिती नाही. राजकीय आणि राष्ट्रीय नेत्याबद्दल अशाप्रकराचे बदनामीकारक लिखाण करण्याचा अधिकार यांना कुणी दिला आहे. सौरभ पिंपळकरचा मास्टरमाईंड कोण आहे? कुणी हे करायला भाग पाडलं? त्याच्या मोबाईलवरून कोणाशी संपर्क झाला आहे का, हे कळलं पाहिजे," असेही अजित पवार म्हणाले.
हेही वाचा