Ajit Pawar : शरद पवारांच्या धमकी मागचा मास्टरमाईंड शोधा: अजित पवार

Ajit Pawar : शरद पवारांच्या धमकी मागचा मास्टरमाईंड शोधा: अजित पवार
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना व्हॉट्स अॅप आणि वेबसाईटच्या माध्यमातून आज (दि.९) सकाळी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar)  यांनी ट्विट करून केंद्र आणि राज्य सरकारने या धमकीची गांभीर्याने दखल घेऊन आरोपींना तातडीने गजाआड करावे. धमकी मागचा खरा मास्टरमाईंड शोधावा. अशा विचारांच्या समाजविघातक शक्तींना वेळीच रोखावे, हेच राज्याच्या हिताचे असेल, अशी मागणी केली आहे.

अजित पवार (Ajit Pawar)  यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'तुमचा लवकरंच दाभोळकर होणार…' अशी देण्यात आलेली धमकी, हे गंभीर प्रकरण आहे. केंद्र आणि राज्य सरकारने या धमकीची गांभीर्याने दखल घेऊन आरोपींना तातडीने गजाआड करावे. धमकी मागचा खरा मास्टरमाईंड शोधावा. अशा विचारांच्या समाजविघातक शक्तींना वेळीच रोखावे, हेच राज्याच्या हिताचे असेल.

पवार साहेबांचे संरक्षण करण्यास महाराष्ट्रातील जनता समर्थ आहे. परंतु डॉ. दाभोळकरांची हत्या करणाऱ्या शक्ती राज्यात पुन्हा सक्रिय झाल्या आहेत, ही बाब अधिक चिंताजनक आहे. निवडणुका जवळ येऊ लागल्याने यापुढे जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषावादाचे असे मुद्दे उपस्थित करुन समाजात द्वेष निर्माण करण्याचे, दुही माजवण्याचे, मतांच्या ध्रुवीकरणाचे प्रयत्न होतील. ते हाणून पाडले जातील. देशातील जनता आता सावध आहे. समाजात द्वेष निर्माण करणाऱ्यांच्या भूलथापांना भुलणार नाही. कुणाच्याही कटकारस्थानांना बळी पडणार नाही.

शेतकऱ्यांचे प्रश्न, कष्टकऱ्यांच्या समस्या, महिलांवरील अत्याचार, वाढती महागाई, वाढती बेरोजगारी याच मुद्यांवर यापुढे महाराष्ट्र ठाम राहील. विकासाच्या मुद्यांवरुन महाराष्ट्राची जनता आता तसूभरही बाजूला हटणार नाही. आदरणीय पवार साहेबांना सोशल मिडियावरुन देण्यात आलेली जाहीर धमकी गंभीर मुद्दा असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याची गांभीर्याने दखल घ्यावी, या मागणीचा मी पुनरुच्चार करतो.

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात सध्या दडपशाही आणि गुंडाराज सुरू आहे. यातून काही बरं वाईट झाल्यास याला केंद्र आणि राज्याचे गृहखाते जबाबदार राहील, असा अप्रत्यक्ष इशारा त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांना दिला आहे. तसेच गृहविभागाने या घटनेची तातडीने दखल घेत कारवाई करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news