

पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांनी अफजल खानचा वध करण्यासाठी वापरलेली वाघनखे आता ब्रिटनमधून महाराष्ट्रात परत आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वाघनखे परत करण्याचे ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे. यासंदर्भात राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार या महिन्याच्या अखेरीस सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी लंडनला जाणार आहेत. या पार्श्वभुमीवर अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी आपल्या साेशल मीडिया X खात्यावर पोस्ट करत मुनगंटीवार यांना एक सल्ला दिला आहे.
शिवरायांनी वापरलेली वाघनखे सध्या ब्रिटनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममध्ये ठेवली आहेत. आता ही वाघनखे परत करण्याबाबत व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियमसोबत सामंजस्य करार केला जात आहे. वाघनखे राज्यात परत आणणार असल्याची घोषणा याआधी सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. या घोषणेमुळे राज्यातील तमाम शिवप्रेमींनी तसेच इतिहास संशोधकांनी आनंद व्यक्त केला होता.
सर्व काही नियोजनाप्रमाणे झाले तर, वाघनखे या वर्षीच परत आणू शकतो. आम्हाला ब्रिटनच्या अधिकाऱ्यांकडून पत्र मिळाले आहे. त्यात त्यांनी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे परत देण्याचे मान्य केले आहे. हिंदू कॅलेंडरनुसार शिवरायांनी अफझल खानला ज्या दिवशी मारले; त्या दिनानिमित्त आपल्याला वाघनखे परत मिळू शकतील. इतर काही तारखांचाही विचार केला जात असून वाघ नखे परत आणण्याच्या पद्धतीही आखल्या जात आहेत," असेही मुनगंटीवार यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
अभिनेता नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी शिवरायांच्या वाघनख्या भारतात परत आणण्याच्या घाेषणेबाबत आपल्या X खात्यावर पोस्ट करत सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार यांना एक सल्ला दिला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की," मुनगंटीवार महाराजांची वाघनख आणताय त्या बद्दल अभिनंदन. जमल तर त्या वाघनखांनी भ्रष्टाचाराचा कोथळा काढता आला तर पहा."
नाना पाटेकर यांच्या या पोस्टवर सोशल मीडिया युजर्सच्या संमिश्र कमेंट येत आहेत. एक युजर्स म्हणत आहे की, "नाना एकच मारा लेकीन सॉलिड मारा, पण कस आहे नाना आजच्या काळात जो सर्वात मोठा भ्रष्टाचार करेल तो सत्तेत सामील करून घेण्याचा ट्रेण्ड चालू आहे. म्हणून या लोकांकडून ही अपेक्षाच ठेवणं चुकीच आहे हो" तर एकजणाने म्हटलेआ हे की,"भ्रष्टाचार 33 कोटी वृक्ष लागवड संबंधी म्हणायचं का ?. नाना पाटेकरांनी यांनी दिलेल्या सल्ल्यावर सोशल मीडियावर कमेंटला उधाण आलं आहे.
हेही वाचा