

पुढारी ऑनलाईन डेस्क : महानायक अमिताभ बच्चन यांच्या याचिकेवर दिल्ली हायकोर्टाने महत्त्वाचे आदेश दिले आहेत. दिल्ली हाय कोर्टाने अंतरिम आदेश दिला आहे की, अमिताभ बच्चन यांचा आवाज, नाव आणि चेहऱ्याशी संबंधीत कोणत्याही गोष्टीचा त्यांच्या परवानगी विना वापर करता येणार नाही. बॉलीवूडचे दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी कोर्टात 'पर्सनॅलिटी राईट्स' च्या संरक्षणासाठी दिल्ली उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता.
अमिताभ बच्चन यांनी याचिका दाखल केली होती की, अनेक कंपन्या त्यांच्या परवानगीविना त्यांचं नाव, आवाज आणि पर्सनॅलिटीचा वापर करतात. हे दीर्घकाळ सुरु आहे. प्रसिद्ध पब्लिक फिगर असलेले अमिताभ बच्चन यांच्या परवानगीविना त्यांची आयडेंटिटी वापरली जाऊ नये, असे याचिकेत म्हटले आहे.
अमिताभ बच्चन यांना या प्रकरणात दिलासा मिळाला असून न्यायमूर्ती चावला यांनी अॅथॉरिटी आणि टेलीकॉम डिपार्टमेंटसाठी निर्देश जारी केले आहेत. अमिताभ बच्चन यांच्या परवानगीविना वापरण्यात आलेले त्यांचे नाव, फोटो तत्काळ हटवले जावेत, असं सांगण्यात आलं आहे.