जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सव सुरू; मंदिराला विद्युत रोषणाई | पुढारी

जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सव सुरू; मंदिराला विद्युत रोषणाई

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा : षडरात्र उत्सवाला अतिशय धार्मिक वातावरणात गुरुवारी सुरुवात झाली. करवीरपीठाचे आद्य शंकराचार्य गुरुवर्य नृसिंह भारती व श्री मार्तंड देवसंस्थानचे विश्वस्त, पुजारी सेवकवर्ग यांच्या हस्ते कुलधर्म कुलाचाराप्रमाणे धार्मिक विधी करून श्री खंडोबा व म्हाळसादेवीच्या उत्सव मूर्तींची घटस्थापना करण्यात आली. या उत्सवानिमित्त जेजुरी गड व खंडोबा मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

सहा दिवस चालणार्‍या धार्मिक उत्सवात मल्हारी सहस्त्रनाम याग, महाप्रसाद, अन्नदान व विविध धार्मिक विधी व कार्यक्रम होणार आहेत. जय मल्हार चंपाषष्ठी अन्नछत्र प्रतिष्ठान, पुजारी-सेवेकरी वर्ग, मार्तंड देवसंस्थान ट्रस्ट, खांदेकरी, मानकरी ग्रामस्थ मंडळ यांच्याकडून उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरुवार मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेदिवशी जेजुरी गडावरील खंडोबा मंदिरात मूर्तींची पाकळनी करण्यात आली. कापसे पैठणीच्या वतीने देवाला नवीन पोशाख घालण्यात आले. चंपाषष्ठी उत्सवानिमित्त मंदिर व गाभार्‍यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. अभिषेक महापूजा व आरती नंतर श्री खंडोबा व म्हाळसादेवीच्या उत्सव मूर्ती वाजत गाजत मंदिराला प्रदक्षिणा करून बालद्वारीत आणण्यात आल्या.

सुमंगल अशा सनई चौघड्याचा सुरात व मल्हारमय वातावरणात करवीरपीठाचे आद्य शंकराचार्य श्री नृसिंह भारती व श्री मार्तंड देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त तुषार सहाने, विश्वस्त पंकज निकुडे पाटील, राजकुमार लोढा, संदीप जगताप, शिवराज झगडे, माजी विश्वस्त डॉ. प्रसाद खंडागळे तसेच पुजारी सेवकवर्गाच्या हस्ते कुलाधर्म कुलाचाराप्रमाणे धार्मिक विधी करून श्री खंडोबा व म्हाळसादेवीच्या उत्सव मूर्तींची घटस्थापना करण्यात आली. यावेळी महाआरती करण्यात येऊन चंपाषष्ठी उपासनेला प्रारंभ झाला.

जय मल्हार चंपाषष्ठी अन्नछत्र प्रतिष्ठानचे गणेश आगलावे, अनिल बारभाई, अविनाश सातभाई, हनुमंत लांघी, प्रशांत सातभाई, बाळासाहेब दिडभाई, चेतन सातभाई, ओम बारभाई, मल्हार बारभाई, गुरव कोळी वीर घडशी पुजारीसेवक आदींनी या धार्मिक विधीचे आयोजन केले. पुरोहित वेदाचार्य शशिकांत सेवेकरी यांनी या धार्मिक विधीचे पौराहित्य केले. यावेळी देवसंस्थानचे कर्मचारी, देवाचे मानकरी, ग्रामस्थ, पुजारी सेवकवर्ग व मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

जेजुरीचा खंडोबा हा राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत असल्याने जेजुरीसह राज्यातील हजारो भाविकांच्या घरात देवाची घटस्थापना होऊन सहा दिवसांच्या उपासनेला सुरुवात झाली आहे. जेजुरी गडावर वाघ्या मुरुळी आणि लोककलावंतांची देवासमोर कलेची हजेरी सुरू झाली आहे. जय मल्हार चंपाषष्ठी प्रतिष्ठानच्या वतीने गडावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून दररोज हजारो भाविकांना अन्नदान केले जात आहे.

 

Back to top button