माणसासारखा चेहरा असणारा मासा | पुढारी

माणसासारखा चेहरा असणारा मासा

अथांग खोलीत अनेक अनोखे जलचर आहेत. या महासागरात प्रचंड नैसर्गिक साधनसामग्रीही आहे. आता याच हिंदी महासागराच्या अत्यंत दुर्गम भागात, अतिशय खोल ठिकाणी वैज्ञानिकांना अनोखे जलचर आढळून आले आहेत. ज्वालामुखीच्या जवळ आढळणारे हे जीव वैज्ञानिकांसाठी कुतुहलाचा विषय बनलेले आहेत. त्यामध्येच माणसासारखा चेहरा असणार्‍या एका माशाचाही समावेश आहे.

म्युझियम व्हिक्टोरिया रिसर्च इन्स्टिट्यूटच्या वैज्ञानिकांना याठिकाणी डोळे नसणारे जलचर, वटवाघळासारखा दिसणारा मासा आणि तीक्ष्ण दात असलेले पालीसारखे दिसणारे मासेही आढळले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या निर्जन अशा कोकोज आयलंड मरीन पार्कमध्ये समुद्रतळाशी खोदकाम सुरू असताना हे जीव आढळून आले. हे बेट 4,67,054 चौरस किलोमीटरच्या भागात पसरलेले आहे. पर्थ शहरापासून हे बेट 2750 किलोमीटर अंतरावर आहे. या बेटाजवळ समुद्रात यापूर्वी अज्ञात असलेल्या अनेक सागरी जीवांचा शोध लागला आहे.

वैज्ञानिक याठिकाणी समुद्राच्या पृष्ठभागापासून तीन मैल खोलीवर सागरी नमुने गोळा करण्यासाठी गेले होते. तिथे त्यांना जिलेटिनसारखी त्वचा असलेली अंध ईल आढळून आली. तिचे डोळे विकसित झाले नव्हते. समुद्रात खोल ठिकाणी सूर्यप्रकाश पोहोचत नाही. अशा ठिकाणी अनेक जलचर असे नेत्रहीनच असतात. वैज्ञानिकांना याठिकाणी एक लिझर्डफिशही आढळली असून तिच्यामध्ये अंडाशय आणि वीर्यकोषही आहे.

डोक्यावर डोळे असलेला एक चपटा मासाही याठिकाणी आढळून आला. त्याचा चेहरा अगदी मानवी चेहर्‍यासारखाच दिसतो. या खोल समुद्रात बॅटफिशही आढळून आले आहेत. ते समुद्रतळाशी आपल्या हातांसारख्या परांच्या सहाय्याने चालतात. याठिकाणी वायपरफिशही आढळून आले आहेत.
*********

Back to top button