

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने अनेक अंतराळ मोहीमा यशस्वीरीत्या राबवून देशाचे नाव जगभर पोहोचविले आहे. या संस्थेविषयीची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी, यासाठी इस्त्रोची 'स्पेस ऑन व्हिल्स' ही बस इंडियन सायन्स काँग्रेसमधील (Indian Science Congress) आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या मोहिमांची व आतापर्यंतच्या अंतराळ प्रवासाची माहिती या बसच्या माध्यमातून देण्यात येत आहे. यात चांद्रयान-1 मोहीम, मंगलयान मोहीम, अवकाशात सोडलेले विविध उपग्रह तसेच इस्त्रोच्या एकूणच आतापर्यंतचा अंतराळ प्रवास या बसमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. चांद्रयान व मंगलयान मोहीम राबविण्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन, मोहीमेची माहिती तसेच ही मोहीम राबविताना आलेली आव्हाने याची देखील माहिती (Indian Science Congress) यात देण्यात आली आहे.
या बसमध्ये लावलेल्या एका स्क्रीनच्या माध्यमातून इस्त्रोचा प्रारंभापासून ते आतापर्यंतचा अंतराळ प्रवास विषद करण्यात आला आहे. आयआरएस सॅटेलाईटच्या माध्यमातून जगातील काही शहरांची छायाचित्रे घेण्यात आली आहेत. ती शहरे अंतराळातून कशी दिसतात, हे सचित्र येथे पाहायला मिळते. यात व्हॅटिकन सिटी, दोहा, दुबई, वॅाशिंग्टन या शहरांचा समावेश आहे.
विशेषतः तरुणांमध्ये विज्ञानाविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न असल्याचे इस्त्रोच्या शास्त्रज्ञ जयती विजयवर्गीय यांनी सांगितले. तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद स्पेस ऑन व्हिल्सला मिळत आहे. कोलकाता येथून आलेल्या सौम्या चक्रवर्ती यांनी सांगितले की, स्पेस ऑन व्हिल्सच्या माध्यमातून इस्त्रोची संशोधन गाथा सचित्र पाहायला मिळत आहे. इस्त्रोचे न उलगडलेले अनेक पैलू या माध्यमातून पुढे आले आहेत. अमरावती येथून आलेला अतुल ठाकरे म्हणाला की, पहिल्यांदा अशाप्रकारच्या विज्ञान प्रदर्शनाला भेट दिली आहे. 'स्पेस ऑन व्हिल्स' हा अत्यंत चांगला माहितीपर उपक्रम आहे.
हेही वाचलंत का ?