चंद्रपूरात २०२२ सालात ३३६ दिवस प्रदूषणाचे; केवळ २९ दिवस आरोग्यदायी; पावसाळ्यात १०५ दिवस प्रदूषण

प्रदुषण
प्रदुषण
Published on
Updated on

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : तीन ‍दिवसांपूर्वीच निरोप घेतलेल्या २०२२ सालात चंद्रपूरातील प्रदूषणात आणखी वाढ झाल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ व महाराष्ट्र प्रदूषण मंडळाची दैनंदिन २४ तासातील हवा गुणवत्ता निरीक्षणाची २०२२ या वर्षातील प्रदूषणाची आकडेवारीतून दिली आहे. त्यामध्ये ३६५ दिवसांत चंद्रपूरमध्ये केवळ २९ दिवस आरोग्यदायी होते. ३३६ दिवस प्रदूषण राहिले आहे. यामध्ये १६४ दिवस कमी प्रदूषण, १५० दिवस जास्त प्रदूषण तर २२ दिवस आरोग्याकरीता अत्यंत हानिकारक राहिलेत. २०२१ च्या तुलनेत २०२२ चंद्रपूरकरच्या प्रदूषणात वाढ झाल्याने चंद्रपूरकरांची चिंता वाढली आहे.

मागील २०२१ सालात ३६५ दिवसात २३४ दिवस प्रदूषित होते. १०२ दिवस आरोग्यदायी होते. तर २०२२ सालात ३३६ दिवस प्रदूषित आढळून आले आहेत. केवळ २९ (चांगली श्रेणी) दिवस आरोग्यदायी आढळून आलेत. आरोग्यदायी जीवनाचे ७३ दिवस कमी होवून प्रदूषणात वाढ झाली. १६४ दिवस हे साधारण प्रदूषण श्रेणीत, १५० दिवस हे माफक प्रदूषण श्रेणीत, २० दिवस अतिशय प्रदूषित श्रेणीत, तर २ दिवस हानिकारक प्रदूषण श्रेणीचे ठरले आहेत. शहरात धोकादायक श्रेणीतील प्रदूषण नोंदविले गेले नाही.

चंद्रपूर जिल्ह्यासोबतच, शहरात आणि औद्यौगिक क्षेत्र खुटाळा येथे २ ठिकाणी दैनंदिन २४ तास वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्राद्वारे वायू प्रदूषणाच्या नोंदी घेतल्या जातात. प्रदूषण नियंत्रण मंडळाने घोषीत केलेली आकडेवारी ही शहरातील केंद्रावरील आहे. या आकडेवारीची शासकीय यंत्रणेद्वारे नोंद केली असली तरी अनेक ठिकाणी या पेक्षाही जास्त प्रदूषण असलयाची माहिती चंद्रपूर येथील पर्यावरण अभ्यासक आणि ग्रीन प्लानेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली आहे. जिल्ह्यातील ४ औद्योगिक क्षेत्रात घुग्गुस आणि राजुरा येथे जास्त प्रदूषण आहे.

पावसाळ्यात १०५ तर हिवाळ्यात १११ दिवस प्रदूषण

चंद्रपूर शहरातील मागील काही वर्षातील पावसाळा हा आरोग्यदायी मानला जात होता. परंतु, आता पावसाळा ऋतूही धोकादायक ठरत आहे. २०२२ वर्षात पावसाळ्यात ४ महिन्यातील १२२ दिवसांपैकी १०५ दिवस प्रदूषण राहिले. जून महिन्यात ३० दिवस, जुलै महिन्यात ३१ दिवस, ऑगस्ट महिन्यात २७ दिवस तर सप्टेंबर महिन्यात ३१ पैकी १७ दिवस साधारण ते माफक प्रदूषणाचे आढळून आले.

२०२१ आणि पूर्वीच्या सालातील पावसाळ्यात मात्र प्रदूषण फारसे नव्हते. पावसाळ्याप्रमाणे हिवाळा ऋतू आरोग्याकरीता चांगला मानला जातो. परंतु हिवाळा ऋतू चंद्रपूरकरांसाठी धोकादायक ठरत आहे. हिवाळ्यातील एकूण १२३ दिवसांपैकी १११ दिवस प्रदूषणाचे ठरले आहेत. भौगोलिकदृष्ट्‍या संथ हवा आणि कमी तापमान हे जास्त प्रदूषणास कारणीभूत ठरतात. या ऋतूतील ऑक्टोबर महिन्यातील २३ दिवस प्रदूषित, नोव्हेंबर महिना ३० दिवस तसेच डिसेंबर महिन्यातील ३१ पैकी ३१ दिवस अतिशय जास्त प्रदूषण आढळून आले आहेत. वर्षातील डिसेंबर महिन्यात जास्त प्रदूषण ठरले आहे. जानेवारी २०२२ मध्ये एकूण ३१ दिवसापैकी २७ दिवस प्रदूषणाचे राहिले.

उन्हाळ्यातील सर्वच दिवसांत प्रदूषण

चंद्रपूरातील उन्हाळा हा नागरिकांसाठी त्रासदायक ठरणार आहे. त्याप्रमाणचे उन्हाळ्यातील फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे या चारही महिने प्रदूषणाचे ठरले आहेत. फेब्रुवारी महिना २८ पैकी २८ दिवस, मार्च महिना ३१ पैकी ३१ दिवस, एप्रिल महिना ३० पैकी ३० दिवस तर मे महिन्यात शुद्धा ३१ पैकी ३१ दिवस प्रदूषण राहिले आहे. उन्हाळ्यातील चारही महिने १२ दिवसांपैकी १२० दिवस गरमी आणि प्रदूषणाचे होते.

वायू प्रदूषण निर्देशांक (AQI) कसा मोजतात

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे देशातील प्रदूषित क्षेत्रात सतत हवा गुणवत्ता मापन केंद्राव्दारे (CAAQMS) मोजणी केली जाते. चंद्रपूरमध्ये २ ठिकाणी ही सुविधा उपलब्ध आहे. यात सूक्ष्म धुलीकन, नायट्रोजन डाय ऑक्साईड, सल्फरडाय ऑक्साईड, कार्बनडाय ऑक्साईड आणि ओझोन किंवा कमीत- कमी मुख्य तीन प्रदूषके याद्वारे AQI निर्देशांक तयार केला जातो. प्रत्येक प्रदूषणाची स्वतंत्र नोंद असते, परंतु, AQI साठी सर्व प्रदूषके मिळून सरासरी मोजली जाते.

चंद्रपूरमधील हवा गुणवत्ता निर्देशांक (Air Quality Index)

  1. ०-५० निर्देशांक हा आरोग्यांसाठी (Good) उत्तम मानला जातो तो आरोग्यासाठी चांगला आहे. चंद्रपूरमध्ये केवळ २९ दिवस आढळून आला.
  2. ५१-१०० निर्देशांक हा (Satisfactory) समाधानकारक प्रदूषित मानला जातो. आजारी असलेल्या लोकांना त्रासदायक ठरतो. चंद्रपूरमध्ये हा साधारण प्रदूषित निर्देशांक १६४ दिवस होता.
  3. १०१-२०० निर्देशांक हा (Moderate) माफक प्रदूषित मानल्या जातो. हृदय, फुफ्फुसाच्या, दमा विकाराने ग्रस्त नागरिक, लहान मुले आणि वृद्धांना धोकादायक ठरतो. यामध्ये बाहेर व्यायाम करण्यावर बंधन असतात. चंद्रपूरमध्ये हा प्रदूषण निर्देशांक १५० दिवस आढळला.
  4. २०१-३०० निर्देशांक हा आरोग्यासाठी हानिकारक (Poor/Unhealthy) श्रेणीत येत असून यामुळे सर्व नागरिकांना श्वसन, हृदय व विविध आरोग्याच्या समस्या उदभवतात. चंद्रपूरमध्ये हा धोकादायक निर्देशांक २० आढळून आला.
  5. ३०१-४०० निर्देशांक हा (very poor) धोकादायक श्रेणीत येत असून चंद्रपूरमध्ये हा प्रदूषण निर्देशांक २ दिवस आढळून आला.
  6. ४०१-५०० निर्देशांक हा (Severe) घातक श्रेणीत येतो. मात्र, चंद्रपूरमध्ये या श्रेणीतील प्रदूषण आढळून आले नाही.

चंद्रपूरातील प्रदूषणावर तातडीने उपाययोजनांची गरज : प्रा सुरेश चोपणे

चंद्रपूर शहरातील थर्मल पॉवर स्टेशन, परिसरातील विविध उद्योग तसेच वाहनांचे प्रदूषणाने नागरिकांचे आरोग्य धोकादायक ठरत आहे. आधुनिक जीवन शैलीमुळे घरात आणि औद्योगिक प्रदूषण, वाहनांचा धूर, धूळ, वाहतूक, कचरा ज्वलन, लाकूड, कोळसा ज्वलन आदी तसेच औद्योगिक क्षेत्रात कोळसा ज्वलन राख, दूषित वायू, वाहतूक आदींचा परिणाम जल, थल, ध्वनी आणि वायू प्रदूषणामुळे चंद्रपुरातील नागरिक मागील १० वर्षापासून त्रस्त आहेत. २००५ ते ०६ च्या आरोग्य सर्वेक्षणामध्ये आरोग्य समस्येची भीष्णता दिसून आली.

दरवर्षी चंद्रपूरच्या प्रदूषणात वाढ होत असल्याने श्वसनाचे रोग, दमा, टीबी, कॅन्सर, सर्दी, खोकला, डोळे, त्वचा, आणि हृदय रोगांचे रुग्ण वाढत आहेत. स्थानिक आमदार किशोर जोरगेवर यांनी नागपूरात पार पडलेल्या अधिवेशनात विचारणा केली होती. परंतु, प्रशासनाने प्रदूषण नाही, रोगराई नाही. परंतु, कृती आराखडा सुरु असल्याचे उत्तर दिले. केवळ कृती आराखडे तयार करून उपयोग नाही तर उपाययोजनांची अंमलबजावणी करावी अशी, अशी प्रतिक्रीया पर्यावरण अभ्यासक आणि ग्रीन प्लानेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे दिली आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news