Bogus University : ‘गोकाक’सह देशातील 20 विद्यापीठे बोगस
बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : Bogus University : विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) देशातील 20 बोगस विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे. त्यात बेळगाव जिल्ह्यातील गोकाकच्या बडगानवी सरकार वर्ल्ड ओपन युनिव्हर्सिटी एज्युकेशन सोसायटीचा समावेश आहे. या विद्यापीठांना विद्यार्थ्यांना कोणतीही पदवी देण्याचा अधिकार नसल्याचे युजीसीने स्पष्ट केले आहे.
बोगस यादीत दिल्लीतील आठ विद्यापीठांसह कर्नाटक, महाराष्ट्र, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि केरळमधील काही विद्यापीठांचा समावेश आहे. युजीसी कायद्यातील तरतुदींच्या विरोधात अनेक संस्था पदवी देत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. अशा विद्यापीठांनी दिलेली पदवी उच्च शिक्षण किंवा रोजगाराच्या उद्देशाने मान्यताप्राप्त किंवा वैध असणार नाही. या विद्यापीठांना कोणतीही पदवी देण्याचा अधिकार नाही, असे युजीसीचे सचिव मनीष जोशी यांनी सांगितले आहे. Bogus University
दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अँड फिजिकल हेल्थ सायन्सेस, प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, एडीआर सेंट्रिक ज्युरिडिकल युनिव्हर्सिटी, कमर्शियल युनिव्हर्सिटी लिमिटेड दरियागंज, युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड इंजिनिअरिंग, विश्वकर्मा ओपन युनिव्हर्सिटी फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट आणि आध्यात्मिक विद्यापीठ यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशात गांधी हिंदी विद्यापीठ, नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ इलेक्ट्रो कॉम्प्लेक्स होमिओपॅथी, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि भारतीय शिक्षा परिषद अशी चार बोगस विद्यापीठे आहेत. आंध्र प्रदेशात ख्रिस्त न्यू टेस्टामेंट डीम्ड युनिव्हर्सिटी, बायबल ओपन युनिव्हर्सिटी ऑफ इंडिया यांना बनावट घोषित करण्यात आले आहे. Bogus University
पश्चिम बंगालमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसीन आणि इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसीन अँड रिसर्च यांचा यादीत समावेश आहे. केरळमधील सेंट जॉन्स विद्यापीठ, महाराष्ट्रातील राजा अरबी विद्यापीठ, पुद्दुचेरीच्या बोधी अॅकॅडमी ऑफ हायर एज्युकेशनही बोगस असल्याचे युजीसीने म्हटले आहे.

