

दापोली (रत्नागिरी) ; पुढारी वृत्तसेवा : मुंबई येथून गणपती सणासाठी दोन दिवसांपूर्वी गावी आलेल्या एका (55 वर्षीय) महिलेचा नदी किनारी कपडे धूत असताना पाय घसरून पाण्यात पडून बुडून मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील शिर्दे येथे घडली. गणेश चतुर्थीच्या दोन दिवस आधी महिलेचा पाण्यात पडून मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिर्दे पूर्व वाडी येथील मीनाक्षी मनोहर खळे ही महिला भोमेश्वर मंदिराजवळ असलेल्या सूर्या नदी किनारी काल (बुधवार) कपडे धुण्यासाठी एकटीच गेली होती. ती बराच वेळ घरी न परतल्याने तिच्या नातेवाईकांनी तिचा शोध घेतला. त्यावेळी तिचा मृतदेह नदीमधील एका झाडात अडकलेला आढळला.
या घटनेची माहिती दापोली पोलिसांना दिल्यावर उपनिरीक्षक निनाद कांबळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वाघ, हेड कॉन्स्टेबल अशोक गायकवाड, वैशाली सुकाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या सहकार्याने त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
गेले दोन दिवस दापोली तालुक्यात अतिवृष्टी सुरू आहे. तालुक्यातील सर्व नद्या दुथडीभरून वाहत आहेत. या नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने त्यात ही महिला वाहून गेली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. गणेशोत्सवाच्या दोन दिवस आधी ही दुर्देवी घटना घडल्याने शिरदे पूर्ववाडीवर शोककळा पसरली आहे.