अग्‍निपथ योजना : भारत बंदला संमिश्र प्रतिसाद | पुढारी

अग्‍निपथ योजना : भारत बंदला संमिश्र प्रतिसाद

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : केंद्र सरकारच्या अग्‍निपथ योजनेच्या विरोधात देशाच्या काही भागात सोमवारी बंद पाळण्यात आला. योजनेला अनेक राज्यांतून विरोध केला जात असून काही संघटनांनी भारत बंदची हाक दिली होती. या पार्श्‍वभूमीवर रेल्वेने आरपीएफ आणि जीआरपी यंत्रणांना अलर्ट जारी केला आहे. आपतर्फे ज्युल चौकक भागात निदर्शने करण्यात आली. त्यांनी भाजपविरोधी घोषणाबाजी केली. दरम्यान, येथे कुठेही हिंसाचाराची घटना घडलेली नाही.

पंजाब-हरियाणा

लष्करात भरती होऊ इच्छिणार्‍या युवकांनी भारत बंदमध्ये सहभागी होत येथे ठिकठिकाणी चक्‍का जाम आंदोलन केले. आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर फतेहाबाद, रोहटक, अंबाला, रेवारी, सोनिपत, लुधियाना, जालंधर, अमृतसर येथे मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
जम्मू काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि इतर पक्ष, संघटनांतर्फे जम्मू शहरात अग्‍निपथ योजना मागे घेण्याची मागणी करत निदर्शने करण्यात आली. येथे महामार्ग रोको आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले.

दिल्लीतील सुरक्षा व्यवस्थेत वाढ

भारत बंद तसेच काँग्रेसचे ईडी विरोधातील आंदोलन या पार्श्‍वभूमीवर राजधानी दिल्लीत सोमवारी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली होती. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये म्हणून दिल्लीच्या सर्व सीमांवर सतर्कतेचे तसेच कडक कारवाईचे आदेश देण्यात आले होते. अर्धसैनिक दलांचे जवानही दिल्लीत तैनात करण्यात आले आहेत.

दिल्ली-एनसीआरमध्ये वाहतूक कोंडी

अग्‍निपथ योजनेच्या विरोधात अनेक संघटनांनी ‘चलो दिल्ली’चा नारा दिला होता. भारत बंदच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी ठिकठिकाणी केलेले बॅरिकेडिंग आणि तपासणीमुळे दिल्ली-एनसीआरमधील वाहतूक कोलमडून गेली. नोएडा, गुरुग्राम, फरिदाबाद, गाझियाबाद सहित इतर सीमांवर सकाळपासून वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या होत्या. चाकरमान्यांना याचा त्रास सोसावा लागला. बिहारमध्ये पाटणा येथील डाक बंगला चौराहा, पंजाबमधील अमृतसर रेल्वे स्थानक या ठिकाणांवर खास लक्ष ठेवण्यात आले होते.

Back to top button