कणकवली : ‘घाटापेक्षा वाहतूक जड’; फोंडाघाटाची स्थिती! | पुढारी

कणकवली : ‘घाटापेक्षा वाहतूक जड’; फोंडाघाटाची स्थिती!

कणकवली : अजित सावंत

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात सुरक्षित अन् आनंददायी प्रवासाचा घाट म्हणून फोंडाघाटाची ओळख होती. आंबोलीप्रमाणेच हा घाटही ब्रिटिशकालीन… घाटाची अजून ‘तशी’ वाट लागलेली नाही; पण करूळ आणि भुईबावडा घाटांत बंद करण्यात आलेली अवजड वाहतूक आता फोंडाघाटावरून सुरू असल्याने या घाटाचा ताण साहजिकच फार वाढला आहे.

‘नाकापेक्षा मोती जड’प्रमाणे ‘घाटापेक्षा वाहतूक जड’ अशी गत झाली आहे. वाढीव अवजड वाहतुकीचा परिणाम म्हणून दाजीपूरवरून पायथ्याशी येताना सुरुवातीच्या चार कि.मी. रस्त्यावर खड्डेच खड्डे पडलेले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातून कोकण, गोव्याकडे होणारी अवजड वाहतूक फोंडाघाटमार्गेच बहुुतांशी होते. घाटातील चार कि.मी.च्या या खड्डेमय भागात डांबरमिश्रित खडी भरण्याचे काम सध्या सुरू आहे. आठवडाभरात ते पूर्ण होईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.

खड्ड्यांची डागडुजी सुरू असली, तरी घाटमार्गात अनेक ठिकाणी संरक्षक कठडे ढासळलेले आहेत. संरक्षक कठडे आणि आधार भिंतींची दुरुस्ती आवश्यक आहे; अन्यथा पावसाळ्यात हा घाटमार्गही ठप्प होण्याची शक्यता आहे. सुमारे 11 कि.मी. लांबीचा फोंडाघाट 10-12 वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणावर ढासळला होता. मात्र, नंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने या घाटमार्गातील धोकादायक दरडी हटवून तो बर्‍यापैकी निर्धोक आणि सुरक्षित केला. परिणामी, मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी होऊनही गेल्या 10 वर्षांत दरडी कोसळण्याच्या काही घटना वगळता फोंडाघाट ढासळलेला नाही.

दोन्ही घाटांची पडझड

यावर्षी झालेल्या अतिवृष्टीने जुलै महिन्यात भुईबावडा घाटमार्ग खचला आणि वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला. करूळ घाटातही संरक्षक भिंतीच ढासळल्या आणि अर्धा रस्ता वाहून गेला. सद्यस्थितीत या दोन्ही घाटमार्गांची अवस्था समाधानकारक म्हणावी, अशी नाही.

मंजूर कामे तरी सुरू व्हावीत

पावसाळ्यात डोंगरातून येणारे पाणी थेट रस्त्यावर येते. त्यामुळे रस्ता खराब होतो. कायमस्वरूपी काँक्रीटची गटारे कडेला आवश्यक आहेत. अनेक ठिकाणी दिशादर्शक फलक नाहीत, साईडपट्ट्या खराब आहेत. सामाजिक बांधकाम विभागाच्या माहितीनुसार, घाटमार्गाच्या नूतनीकरणासाठी सुमारे दीड कोटीची कामे मंजूर झाली आहेत. अर्थात, हे पुरेसे नाही; पण जी कामे मंजूर झाली आहेत, ती सत्वर सुरू व्हावीत व योग्य पद्धतीने व्हावीत, अशी अपेक्षा आहे.

  • संरक्षक भिंती ढासळल्या
  • गटारे, दिशादर्शक फलकांची गरज

Back to top button