

पुणे; पुढारी वृत्तसेवा : आपल्या विनोदी लेखनाने वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ साहित्यिक आणि कथाकथनकार प्रा. दत्ताराम मारुती ऊर्फ द. मा. मिरासदार (वय 95) यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
अकलूज येथे 14 एप्रिल 1927 रोजी मिरासदार यांचा जन्म झाला होता. अकलूज आणि पंढरपूर येथे शिक्षण घेतल्यानंतर ते पुण्यात आले. एम. ए. पदवी संपादन केल्यावर काही काळ त्यांनी पत्रकारिता केली. कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत शिक्षक म्हणून 1952 मध्ये ते अध्यापन क्षेत्रात आले. 1961 मध्ये ते मराठीचे प्राध्यापक झाले.
व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील आणि द. मा. मिरासदार या तिघांनी 1962 पासून महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागात कथाकथनाचा कार्यक्रम सादर करण्यास सुरुवात केली. एकत्रित कथाकथनाचे त्यांनी तीन हजारांहून अधिक कार्यक्रम केले. ध्वनीक्षेपकासमोर उभे राहून हातवारे करीत मिरासदार बोलू लागल्यावर श्रोत्यांना एक अद्भुत नाट्य अनुभवायला मिळायचे. कोलकत्ता, इंदौर, हैदराबाद अशा शहरांतून त्यांचे कथाकथनाचे कार्यक्रम झाले होते. कॅनडा आणि अमेरिकेमध्ये 25 कार्यक्रमांचा विक्रमही त्यांनी केला होता.
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी, चिं. वि. जोशी, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे यांनी जोपासलेल्या विनोदी लेखन परंपरेमध्ये मिरासदार यांनी आपली वेगळी छाप उमटवली होती. 'व्यंकूची शिकवणी', 'माझ्या बापाची पेंड', 'भुताचा जन्म', 'माझी पहिली चोरी', 'हरवल्याचा शोध' या त्यांच्या कथा उत्कृष्ट लेखन आणि उत्तम सादरीकरणामुळे वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या मनावर कोरल्या गेल्या आहेत.
'गप्पागोष्टी', 'गुदगुल्या', 'मिरासदारी', 'गप्पांगण', 'ताजवा' असे त्यांचे 24 कथासंग्रह आहेत. 'एक डाव भुताचा' या चित्रपटाच्या कथा-पटकथा लेखनासह त्यांनी हेडमास्तरची भूमिकाही साकारली होती. 'एक डाव भुताचा' आणि 'ठकास महाठक' या दोन चित्रपटांच्या संवादलेखनाबद्दल त्यांना पारितोषिके मिळाली होती. 'व्यंकूची शिकवणी' या त्यांच्या गाजलेल्या विनोदी कथेवरून 'गुरुकृपा' या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती.
मिरासदार यांच्या कथासंग्रहांतील बहुतेक कथा या ग्रामीण जीवनातील विसंगतीचे, विक्षिप्तपणाचे आणि इरसालपणाचे दर्शन घडवून त्यातील विनोद अधोरेखित करणार्या आहेत. मात्र, 'स्पर्श', 'विरंगुळा', 'कोणे एके काळी' सारख्या काही गंभीर कथांतून त्यांनी जीवनातील कारुण्यही टिपले आहे. तरीही त्यांची स्वाभाविक प्रवृत्ती मिस्कील कथा लिहिण्याकडेच आहे. 1998 मध्ये परळी वैजनाथ येथे झालेल्या 71 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.
त्यानंतर एका तपाने पुण्यात झालेल्या 83 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात 83 वर्षांच्या मिरासदार यांनी 'भुताची गोष्ट' ऐकवली होती. दीड तासाहून अधिक काळ रंगलेल्या या गोष्टीने अवघा मंडप हास्यकल्लोळात बुडून गेला होता. भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात त्यांनी राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्षपद भूषविले होते.