

ब्यूनस आयर्स : इतिहासातील अनेक व्यक्तींच्या मृत्यूबाबत नेहमीच उलटसुलट दावे केले जात असतात. त्यामध्ये साठ लाख ज्यूंची हत्या करणार्या आणि जगाला दुसर्या महायुद्धाच्या खाईत लोटणार्या जर्मनीच्या अॅडॉल्फ हिटलर या हुकुमशहाचाही समावेश आहे. महायुद्धाच्या अखेरीस हिटलरने आत्महत्या केली होती असे इतिहासात नोंदवलेले आहे. मात्र, त्याने गुपचूप अन्यत्र पलायन केले होते असेही दावे अनेक लोक करीत असतात. आताही दक्षिण अमेरिकेच्या अर्जेंटिना देशातील किनारपट्टीलगत एका नाझी पाणबुडीचे अवशेष सापडल्याने अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. पाणबुडीचे हे अवशेष शोधणार्या व्यक्तीचा दावा आहे की याच पाणबुडीतून हिटलर जर्मनीतून अर्जेंटिनाला पळून आला होता.
हे अवशेष 260 फूट लांबीचे आहेत. ते 'मिसिंग लिंक रिसर्च ग्रुप'च्या सदस्यांनी क्वेक्वेनजवळ शोधले आहेत. ग्रुप लीडर अबेल बस्ती यांचे म्हणणे आहे की हिटलरने आत्महत्या केली नव्हती. तो या पाणबुडीतून जर्मनीतून पळाला होता आणि अर्जेंटिनात येऊन त्याने एक नवे जीवन सुरू केले होते. अर्जेंटिनाच्या नौदलातील पाणबुड्यांनी हे अवशेष तपासले असून त्याचे पहिले छायाचित्रही जारी केले आहे.
66 वर्षांचे अबेल बस्ती एक पत्रकार आणि लेखकही आहेत. त्यांनी सांगितले की ही पाणबुडी 1945 च्या हिवाळ्यात बाहेर पडली होती असे दिसते. या पाणबुडीला जाणूनबुजून बुडवण्यात आले होते. हिटलरच्या पलायनाबाबतचे सर्व पुरावे नष्ट करण्यासाठी हे करण्यात आले. हिटलरला क्वेक्वेनच्या उत्तरेकडील मोरोमार येथे जर्मन एजंटांद्वारे बनवण्यात आलेल्या एका खास परिसरात नेण्यात आले होते. 1945 मध्ये यू-बोट 'यू-530'ने अर्जेंटिनामध्ये आत्मसमर्पण केले होते. त्याचवेळी नाझी सैन्यातील बड्या अधिकार्यांना या बोटीतून आणले जात असल्याची पुष्टी झाली होती.
बहुतांश लोकांना असे वाटते की एप्रिल 1945 मध्ये हिटलरने बर्लिनमधील एका बंकरमध्ये आत्महत्या केली होती. मात्र, काहींना हिटलर पळून गेला होता असेही वाटते. दुसर्या महायुद्धात ज्यावेळी जर्मनीचा पराभव होऊ लागला त्यावेळी अनेक नाझी युरोपमधून पळून गेले होते. त्याला 'रॅटलाईन'ही म्हटले जाते. नाझींनी गुप्त मार्गाने दक्षिण अमेरिकेचा आश्रय घेतला होता असे म्हटले जाते. सायमन वीसेन्थल इन्स्टिट्यूटने 2020 मध्ये काही दस्तावेज प्रसिद्ध केले होते. त्यामध्ये अर्जेंटिनामध्ये पळून आलेल्या 12 हजार नाझींची माहिती होती.