

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : सिद्धेश्वर धरणाचे सहा दरवाजे उघडले : जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरणाच्या पाणी संचय पातळी पूर्ण झाली असून धरणाचे सहा दरवाजे बुधवारी सकाळी आठ वाजता उघडण्यात आले आहेत. या दरवाज्यातून 4368 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.
पावसाचा अंदाज लक्षात घेऊन धरणाचे आणखी दरवाजे उघडण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे पाटबंधारे विभागाच्या सुत्रांनी सांगितले.
जिल्ह्यातील सिध्देश्वर धरणाची पूर्ण संचय पातळी 413 मीटर आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत 412.655 मीटर पाणी पातळी झाली होती. धरणाच्या लाभ क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे धरणातील पाणी पातळी झपाट्याने वाढली. त्यामुळे धरणातील पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानुसार बुधवारी सकाळी आठ वाजता धरणाचे 1, 14, 7, 8, 4. 11 या क्रमांकाचे दरवाजे उघडण्यात आले आहे. या सहा दरवाज्यातून 4368 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
धरणाचे पाणी पूर्णा नदीच्या पात्रात सोडण्यात आले आहे. सध्या धरणाच्या लाभ क्षेत्रात पाऊस असून धरणात सुमारे 5 हजार क्युसेक पाण्याचा येवा येत असल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
लाभ क्षेत्रात आणखी पाऊस झाल्यास पुढील काळात आणखी दरवाजे उघडले जाणार असल्याचे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष बिराजदार, अभियंता भुषण कनोज म्हणाले.
जिल्ह्यात मागील २४तासात सरासरी 50.30 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आता पर्यंत 81.58 टक्के पाऊस झाला आहे. यामध्ये हिंगोली तालुक्यात 49.50 मिलीमिटर, कळमनुरी 59, वसमत 52.50, औंढा नागनाथ 56.20 तर सेनगाव तालुक्यात 35.90 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, जिल्हयातील 30 पैकी चार मंडळात अतिवृष्टी झाली असून यामध्ये जवळाबाजार 98, गिरगाव 80, वारंगा 92 तर सिरसम मंडळात 84 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे.
हे ही वाचलं का?
https://youtu.be/0C9F33TFAhc