

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : यंदाच्या गणेशोत्सव काळ सोन्या-चांदीचे अलंकार बाप्पाचा थाट वाढवणार आहे. लाडक्या गणरायाचे शुक्रवारी आगमन होत आहे. त्याच्या स्वागतासाठी अबालवृद्ध आतुरले असून, गणरायाच्या आदरातिथ्यात कमी राहू नये, यासाठी सोन्या-चांदीचे अलंकार पूजेचे साहित्य खरेदी करण्यास भाविक पसंती देत आहेत.
यंदा गणपतीसह गणोबाही सोन्या-चांदीच्या दागिन्यांनी मढणार आहे. ज्यांना शक्य नाही ते भाविक बाप्पाचा थाट वाढवण्यासाठी 1 ग्रॅमच्या दागिन्यांना मागणी करताना दिसत आहेत.
गणरायाच्या रुबाबात भर घालणारी 'चिक मोत्याची माळ' मागे सरली असून, त्याऐवजी विविध धातू, त्यावर सोन्याचा मुलामा असलेल्या दागिन्यांची भुरळ गणेशभक्तांना पडली आहे.
तुलनेने कमी किमतीत विविध आभूषणे उपलब्ध असल्याने त्यांना विशेष मागणी आहे.
चांदीच्या धातूतील सुकामेव्याचा नैवेद्य, पूजा साहित्य व आभूषणांचा एकत्रित संच असे अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत.
यंदा चांदीचे गणपती आणि गौरीसाठी विविध आकारातील 15 हून अधिक मुकुटांचे प्रकार, कमळहार, चक्रीहार, 21 किंवा 11 मोदकांचा हार, सोन्याचा मुलामा असलेला मोदक, चांदी व सोन्यातील गणरायाचा शेला, रामराज्य तोडे, उंदीर, परशु, जाणवे, सुपारी, विड्याचे पान, केवड्याचे पान, केळी, जास्वंद, कंठीमाळ अशी विविध आभूषणे, पुजेची उपकरणे वजनाप्रमाणे उपलब्ध आहेत.
याशिवाय चांदीच्या वस्तूंमध्ये दुर्वा, दुर्वांचा हार, तुळस, तुळशी वृंदावन, निरांजण, दिवा, पंचपाळे, बाजूबंद, पाट, ताम्हण, गडवा, पेला, तक्क्या, पळी यांसारख्या वस्तू विविध आकार आणि डिझाईन्समध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
काहीजण एक ग्रॅम दागिन्यांचा मार्ग निवडून घरच्या गणपतीची सजावट करण्याची इच्छा पूर्ण करणार आहेत.
सोने-चांदीच्या दागिन्यानंतर मोत्याच्या कंठीहार, कंबरपट्टा, बाजूबंद आदी आभूषणांना ग्राहकांची पसंती आहे.
गतवर्षीपासून कोरोनामुळे प्रत्येक सण आर्थिक आणि आरोग्य सुरक्षा या कारणांनी साधेपणाने साजरे होत आहेत. सार्वजनिक गणेश मंडळांची गणेशाच्या दागिन्यांची प्रत्येक वर्षी असणारी मागणी तुलनेने अर्ध्यापेक्षाही कमी झाली आहे. याउलट श्रद्धा भावनेने घरगुती गणेशाच्या दागिन्यांच्या खरेदीला ग्राहकांचा प्रतिसाद अधिक मिळतो आहे. लॉकडाऊन, सोने दरवाढ यामुळे यंदा बाप्पाच्या अलंकार खरेदीत 30 ते 40 टक्क्यांची घट झाली आहे.
– भरत ओसवाल, महेंद्र ज्वेलर्स