

सातारा : पुढारी वृत्तसेवा
लक्ष्मी टेकडी, सदरबझार येथे गर्दी जमवून विना परवाना वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी पिता-पुत्रावर गुन्हा दाखल करुन चौघांना अटक केली. दरम्यान, पोलिसांनी यामध्ये लाऊडस्पीकरचे साहित्य जप्त केले आहे. सुरज सुखपाल सोळंकी मुलगा अमित सोळंकी (रा.सदरबझार), उमाकांत नागे, उमेश गायकवाड (रा.जुनी भाजी मंडई, सदरबझार) यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी, सुरज सोळंकी यांच्या मुलाचा वाढदिवस दि. 19 रोजी होता. यासाठी त्यांनी विना परवाना आयोजन केले. लाऊडस्पीकर, गर्दी यामुळे परिसर दणाणून गेला. लक्ष्मी टेकडी परिसरातील या घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पोनि भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदीप मोरे, पोलिस हवालदार राहूल खाडे, सुनील कर्णे, संतोष कचरे, विजय गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहताच अनेकजण पसार झाले. पोलिसांनी याप्रकरणी लाऊडस्पीकर जप्त करुन घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांच्या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली. प्राथमिक माहिती घेत संबंधितांना ताब्यात घेवून त्यांना पोलिस ठाण्यात आणण्यात आले. विविध कलमान्वये गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरे करणे. विना परवाना फ्लेक्स लावणे. मोटारसायकल रॅली काढणे याला बंदी असून तसे कोणी केल्यास गुन्हा दाखल करुन अटक करणार असल्याचा इशारा शहर पोलिसांनी दिला आहे.